भावतरंग
मनातील विविध भावभावनांचे हळुवार तरंग!! मनीच्या गूजगोष्टी....
Sunday, April 12, 2026
प्रिय आशाताई....
Thursday, November 24, 2022
Social Life...
सुरवाती सुरवातीला, एकमेकांपासून दूर गेलेल्या माणसांना जवळ आणण्यासाठी कौतुकपात्र ठरलेल्या या social media चा आता खरोखर अतिरेक झालाय. आता ते दूरचेच इतके जवळचे वाटू लागलेत की खरे जवळचे नजरेआड होत चाललेत. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांशी धडपणे बोलायलाही वेळ नसणाऱ्या माणसांकडे virtual जगतात इतकं ऍक्टिव्ह असायला वेळ कसा असतो हे एक आश्र्चर्यच आहे. अनेक दिवसांनी एकत्र आलेली बहिण-भावंडं, मित्रमंडळी जेव्हा समोरासमोर एकमेकांशी बोलून, मनाने जास्त जवळ येण्याऐवजी एकाच खोलीत बसून, पण आपापल्या मोबाईल्स मधे डोकी खुपसून, त्यावरच्या कुठल्याशा ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी बोलताना (?) दिसतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते खरंच! म्हणजे आपण ज्या व्यक्तीशी virtual माध्यमातून बोलत आहोत ती स्वतः, प्रत्यक्ष, आत्ता या क्षणी आपल्या समोरच आहे आणि आपण तिच्याशी फेस -टू-फेस पण बोलू शकतो हेही विसरायला होत असेल माणसाला? आणि मग त्यातूनच 'नवरा, जेवणाच्या टेबलवर समोरच बसलेल्या बायकोकडे पोळी पण Whatsapp वरूनच मागतोय' अशा प्रकारचे jokes (?) तयार होतात आणि मग काय? ते पण हजारोंना फॉरवर्ड!!
आपल्या आयुष्यात घडणारी अगदी छोट्यात छोटी आणि खरं तर ज्याने दुसऱ्याला काहीही फरक पडत नाही अशी प्रत्येक घटना social websites वर टाकून पब्लिसिटी मिळवायचं व्यसनच जडलंय हल्ली कित्येकांना.. मग मतदान केल्याचे photos टाकणं म्हणजे तर फारच 'important' गोष्ट! आपण आपलं एक बेसिक कर्तव्य पार पाडलंय हे कळायला नको का जगाला?! कुठल्याही प्रेक्षणीय ठिकाणी जा, माणसांना ते स्थळ, तो परिसर डोळ्यात साठवून घेण्यापेक्षा स्वतःची छबी कॅमेऱ्यात साठवण्यातच जास्ती इंटरेस्ट असतो. आणि मग लगेच त्या छब्या जातात फेसबुकवर. म्हणजे प्रत्यक्ष ते स्थळ बघण्यापेक्षा, 'आम्ही असं असं स्थळ बघून आलो' हे लोकांना कळवण्यातच खरा आनंद! या पब्लिसिटीच्या नादात अगदी खाजगी क्षण सुद्धा चव्हाटयावर आणू लागलेत आजकाल लोक.. बरं, तुम्ही आज काय खाल्लं, कितीला उठलात किंवा कुठली सिरीयल पाहिलीत याच्याशी तमाम जनतेचा काय संबंध? (एखाद्या वेळी काही special असेल तर ठीके, पण रोज रोज?!!) खोटं वाटेल पण फेसबुकच्या एका ग्रुपवर नुकतीच एका महाभागांनी एक पोस्ट टाकली होती - 'आज सकाळी माझा गाल चावला गेला!!!!!!!!' अरे???!!! काय हे? आता फक्त 'लघु किंवा दीर्घ शंकेला जाऊन येत असल्याचे' updates टाकू नयेत कुणी म्हणजे मिळवली!!! हा social mediaचा वापर म्हणायचा की गैरवापर?
खरं पहायला गेलं तर 'social' या शब्दात 'society' चा - 'समाजाचा' काहीतरी विचार असणं अभिप्रेत आहे. पण मग, 'socially active' असणारे कितीजण खरंच 'समाजासाठी active' असतात? अगदी 'समाजकार्य' वगैरे राहूचदे पण कित्येक घरांमधे आज अशी परिस्थिती आहे की virtual जगातली नाती जोडण्याच्या नादात घरातल्याच म्हाताऱ्या माणसांशी निवांत बसून चार शब्द बोलायला पण कुणाला फारसा वेळ नाही. समाजकार्य करायचं म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात जाणे वगैरे तर लांबचीच गोष्ट झाली.. हां पण social sites वर सामाजिक विषयांवर गप्पा सुरु करा - सगळे पुढे! नुसत्या कृतीशून्य चर्चा.. 'Social' च्या नावाखाली जास्तीत जास्त 'स्वकेंद्रित' होणं म्हणजे 'socially active' असणं असं गणित झालंय बहुतेक. कुठल्याही गोष्टीप्रमाणे यालाही अपवाद आहेत अर्थात. या 'social media' चा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेऊन काही विधायक करणारे लोक ही आहेत; पण दुर्दैवाने खूपच कमी. बाकीचे सगळे मात्र 'social' पोस्ट टाकता येण्यासाठीच 'life' जगतात की काय देव जाणे!!
Sunday, November 6, 2022
नित्य दिवाळी!!
येणार, येणार; आली, आली म्हणता म्हणता दिवाळी येऊन गेली सुद्धा...
आणि हे ह्याच वर्षीचं नाही, तर दर वर्षीचं आहे. कित्ती आधीपासून दिवाळीचे वेध लागत असतात!! म्हणजे खरंतर, नवीन वर्षाचं calendar आल्या आल्याच, पहिले, 'ह्या वर्षी दिवाळी कधीये?' हे बघणारे माझ्यासारखे बरेच असतील. पण ती आली की भरकन संपूनही जाते... नुकतीच दिवाळी होऊन गेलीय हे दर्शवणाऱ्या उगाच चार दोन किरकोळ खुणा तेवढ्या मागे राहतात... दारात दिमाखात उभा असलेला, पण हळूहळू पडझड व्हायला लागलेला, किल्ला... 'हो, हो, उद्या नक्की काढतो' म्हणत नवऱ्याने तसंच ठेवलेलं दारावरचं lighting आणि आकाशकंदील... (दिवाळीतल्या नवीन वर्षाच्या निमित्ताने केलेली रोषणाई, direct इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावरच निघते बरेचदा 😜😜) डब्यांमधून उरलेले फराळाचे पदार्थ... (हो, हे लिहीत असताना ते डबेही जाणीव करून देतायत मला की 'नवऱ्याचं lighting चं काम जसं pending आहे तसंच तुझंही हे नंतरच्या आवराआवरीचं काम राहिलंच आहे' 😔😔) लेकाच्या फटाक्यांपैकी, नंतर match जिंकल्यावर वगैरे फोडण्यासाठी म्हणून ठेवलेले थोडेफार फटाके... एव्हाना बऱ्यापैकी संपत आलेला 'मोती' साबण... बाहेरून कुठेतरी लांबून, मधेच येणारे फटाक्यांचे आवाज... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी संपली तरी सुट्टी संपली नसल्यामुळे घरात चालू असणारा धिंगाणा...
आपल्याकडे इतके विविध सण असले तरी दिवाळी
म्हणजे सगळ्यात लाडका सण - अगदी लहानपणापासून. बहुतेक सगळ्यांचंच असावं असं.
अर्थात वय वाढल्यामुळे आणि बदललेल्या भूमिकांमुळे, उत्साहाची level पण बदललीय आताशा. कारण लहानपणी काय, सण साजरा करण्याचे सगळे
कष्ट तर आईबाबांनीच घेतलेले असायचे. आम्ही म्हणजे नुसतं, 'खाओ पीओ, मजा करो'! आईने
बिचारीने खपून बनवलेला फराळ हाणायचा, बाबांनी आणून दिलेले फटाके, दादाच्या मागे
मागे करत फोडायचे, नवीन कपडे घालून मिरवायचं, बास!! पण आता आईची भूमिका माझ्याकडे
आल्यामुळे, ती खपून फराळ बनवणारी 'बिचारी', मी असते! 😜😜 मग आपोआपच लहानपणच्या निष्काळजी, निवांत उत्साहाला,
जबाबदारीचा break लागतोच ना! 😂😂
तर ह्या फराळाची एक वेगळीच तऱ्हा! दिवाळी आली
आणि फराळाचा विषय सुरू झाला की दरवर्षीचा एक ठरलेला dialogue म्हणजे, 'हेss उगीच आपलं मरमरून इतकं सगळं बनवायचं आणि शेवटी संपवताना
मारामार'! आणि दर वर्षी असंच म्हणत म्हणत, परत फराळ मात्र बनवायचा सोडायचा नाही!
🤭🤭 त्यात दरवर्षीचा अनुभव असला तरी नवरा सांगणार, 'भरपूर बनव हां
काय ते, उगीच एवढं एवढंसं नको 🙄🙄, कुणाकुणाला द्यायला वगैरे कमी
नकोय पडायला..' नाही, ते कुणाकुणाला दिलं जातं हे खरंय, पण ते 'कुणीकुणी' पण
देतातच की आपल्याला!! पण नाही! बायकोचं पटवून घेतलं तर त्सुनामी नाही येणार?? 😏😏 आणि पहिल्याच दिवशी ह्याचा स्वतःचा, फराळाचं खाण्याचा
उत्साह निम्म्यावर आलेला असतो. पण काय करणार? 'नवऱ्याला खुश ठेवण्याचा मार्ग
त्याच्या पोटातून जातो' वगैरे तद्दन फिल्मी dialogues चा पगडा असल्यामुळे, खपते 'बिचारी'! 😜😜
ह्या फराळाच्या पदार्थांचं ना, आपल्या
आयुष्यासारखं असतं, किनई? आपल्याला हव्याहव्याशा गोष्टी चटकन संपून जातात. म्हणजे
आपला तसा स्वभावच असतो; आवडणाऱ्या, हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टींनाच preference देण्याकडे आपला कल असतो आणि जरा कमी आवडत्या गोष्टी आपण
उगाचच मागे टाकत राहतो - भले नंतर तरी त्या आपल्यालाच पूर्ण करायच्यात हे माहीत
असूनही... पण अशाने, शेवटी, नकोशा वाटणाऱ्या गोष्टी एकत्र साठून राहतात आणि
आपल्यालाच त्या संपवाव्या लागतात. फराळाच्या बाबतीत किमान, अगदीच आपल्याला खपलं
नाहीच, संपलं नाहीच तर, शेवटी, आपल्या घरी येणाऱ्या मावशींना वगैरे देऊन तरी टाकू शकतो
आपण एकवेळ; पण आयुष्याच्या बाबतीत मात्र तसं नसतं ना boss! My life, my sufferings :
non-transferable!
फराळासारखीच अवस्था कपड्यांचीही! बरेचदा, घ्यायचे म्हणून नवीन कपडे
घेतले जातात; पण नंतर, कपाटातून ओसंडून वाहणाऱ्या आधीच्या कपड्यांना 'sharing' शिकवून,
नव्या कपड्यांसाठी जागा करून द्यायला लावावी लागते; नाहीतर जुमानत नाहीत अहो ते! 😜😜
पणत्यांचीही तीच गत... जितक्या जास्त पणत्या मांडू, तेवढं सुंदर
दिसतं म्हणून मारे उत्साहाने जास्तीत जास्त पणत्या लावल्या जातात; पण दिवाळी संपली
की त्यांची सगळी उस्तवार करावी लागते.
उटणी वगैरे संपवावी लागतात, तेला-उटण्यासाठी काढलेल्या चांदीच्या
वाट्या नीट आत ठेवून द्याव्या लागतात.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे 2-3 दिवस आणि कदाचित पुढचेही
काही दिवस जी वेगवेगळी खादाडी होते, तिच्या पार्श्वभूमीवर शरीराला पण मुश्किलीने 'normal' वर आणावं लागतं... 🙈🙈
म्हणजे प्रत्यक्ष दिवाळी तर 2 नाहीतर 3 दिवसात निघूनही जाते; पण
मागाहून करण्यासाठी कामांची list मात्र ठेवून जाते. आणि तरीही ती आपल्याला इतकी हवीहवीशी का बरं
वाटत असेल? कारण, येण्याच्या आधीपासून, प्रत्यक्ष असताना आणि गेल्यावरही ती आपल्याला
एक नवा उत्साह, नवी ऊर्जा, नवा प्रकाश देऊन जाते! कुठल्या ना कुठल्या आठवणींच्या
रूपाने कित्येक दिवस आपल्या मनात रेंगाळत राहते! नात्यांमधली वीण घट्ट करून
जाते!
एखादी गोष्ट आपल्याला कितीही हवीहवीशी वाटली, तिच्यासाठी आपण
कितीही मेहनत घेतली असली, तरीही ती काही कायमसाठी रहात नाही, ती मागे सोडून
आपल्याला पुढे जावंच लागतं. दिवाळीसाठी कितीही खपून, कितीही मोठी, कितीही सुंदर
रांगोळी काढली आणि ती भले आपल्याला कितीही आवडली, तरी दुसऱ्या दिवशी ती पुसून
टाकावीच लागते ना, तसंच...
आणि ह्याचीच दुसरी बाजू अशीही आहे की एखादी
गोष्ट कायमसाठी राहणार नाहीये म्हणून 'जाऊदे ना, काय दोन दिवसांसाठी एवढं करत
बसायचं?' असं म्हणत, तिच्यासाठी कष्टच घेतले नाहीत असंही करून चालत नाही. नाहीतर
आपल्याला कशातूनच आनंद मिळणार नाही. त्या त्या वेळचे कष्ट सुद्धा एक वेगळं समाधान
देऊन जात असतात. त्या त्या क्षणाचा आनंद देत असतात!
दिवाळी हा प्रकाशाचा सण! दुरीताच्या,
नकारात्मकतेच्या तमावर मात करण्याचा सण! आपले सगळे प्रश्न, तात्पुरते का
होईना, बाजूला ठेवून, आनंद घ्यायची आणि द्यायची शिकवण आपल्याला दिवाळी देते. आणि
मग, अशा पद्धतीने, कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगात गुंतून न पडता, येईल तो क्षण
साजरा करणं जर आपल्याला जमायलाच लागलं, तर आपल्याकडे तर 'नित्यच दिवाळी' होईल,
नाही का??? 🪔🪔🪔
© रश्मी पानसे - नाझिरकर
Saturday, October 15, 2022
जालीम औषध!! 😜😜
Friday, October 14, 2022
चंदा है तू!!!
कोजागरी पोर्णिमा आहे, हातात दुधाचा ग्लास आहे, आकाशातला पूर्ण चंद्र आणि त्याचं चांदणं मनाला वेड लावतंय... आणि अशा वेळी गाणी आठवली नाहीत तर तो 'foul' धरतात म्हणे! कुठल्याही संगीतप्रेमी माणसाला अशा वेळी आपोआपच स्फुरण चढेल!
काल असंच त्या चंद्राकडे बघताना मनात विचार आला, की चंद्र आपल्याला जास्त जवळचा वाटायला लावला तो ह्या गाण्यांनीच! हे असं म्हणणं खरंतर तसं धाडसाचंच आहे आणि त्यासाठी मी चंद्राची अगदी मनापासून माफीही मागते. चंद्राचं शीतल, मनाला भुरळ पाडणारं सौंदर्य नक्कीच निर्विवाद आहे; पण तरीही ह्या गाण्यांनी चंद्राशी आपलं काही ना काहीतरी नातं जोडून दिलं - तो कुणाचा मामा तर कुणाचा भाऊ, कुणाचा सखा तर कुणाचा जिवलग, कुणाचा साक्षीदार तर कुणाचा हमदर्द झाला... कुणाकुणाचा तर प्रतिस्पर्धी देखील! आणि ही किमया नक्कीच गाण्यांचीच!
अगदी लहानपणापासून चंद्राने आपल्या भावविश्वात स्थान पटकावलेलं असतं. 'चांदोबा, चांदोबा, (चांदोमामा, चांदोमामा) भागलास का?' हे बडबडगीत ऐकलं नसेल असं एकही मराठी मूल नसेल. पिढ्यानपिढ्या तो चंद्र आपला निंबोणीच्या झाडामागे लपत राहतो बिचारा! पण फक्त मामाच नाही बरका, हा चंद्र कधीकधी "गुरुजी" ही बनतो आणि वाऱ्याच्या विमानात बसून मुलं चांदोबा गुरुजींची शाळा बघायला गगनाची सहल करून येतात. 'चांदोबा, चांदोबा भागलास का?' असो नाहीतर 'ह्या वाऱ्याच्या बसुनी विमानी' असो, हल्लीच्या animations मुळे ही गाणी जास्ती आकर्षक बनली आहेत! 'चंदा राणी, चंदा राणी, का गं दिसतेस थकल्यावाणी?' ह्या बालगीतात तर चंद्राचा उल्लेख स्त्रीलिंगी केलेला आहे!
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चंद्राचं आकर्षण असतं हे जरी खरं असलं तरी त्याच्यावर जास्त हक्क मात्र तरुणाईचा आणि त्यातही प्रेमी युगुलांचाच!! चंद्रामध्ये त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसतो किंवा मग तो चेहराच चंद्र वाटायला लागतो!! मला तर वाटतं की उपमा किंवा रूपक ह्या दोन्ही अलंकारांसाठी सर्वात जास्त वापरला गेलेला शब्द असेल चंद्र!! 'ये चांद सा रोशन चेहेरा' असो, नाहीतर 'चेहेरा है या चांद खिला है' असो... 'एक लाजरा न साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं' असो, नाहीतर 'चांद माझा हा हासरा' असो... कालिदासपासून ते आजच्या एखाद्या, नुकतीच कविता लिहायला लागलेल्या, कवीपर्यंत प्रत्येकाला, प्रेम व्यक्त करताना, कधी ना कधी चंद्राने भुरळ घातलीच आहे.
बर फक्त आपल्या प्रिय व्यक्तीचं कौतुक करण्यापुरतं हे मर्यादित असतं तरी ठीक होतं; पण चंद्राशी जवळीक इतकी वाढली की हळूहळू चंद्राशी तुलना करून, वर त्याला कमी लेखण्याचंही धाडस करू लागली हो माणसं! 'छुप गया बदली में जाके चांद भी शरमा गया...' किंवा 'ए चांद, तेरी चांदनी की कसम, मेरे पास भी एक चांद है, तुझ में तो फिर भी दाग है, मेरा चांद तो बेदाग है'... किंवा मग, 'आसमाँ कहता है रब से, तुने चांद दो क्यों बनाए, एक में रखा है दाग, दुसरा है साफ साफ, सबकी नजर उस पे जाये, वो ही तो है, मेरी है वो ही तो, के जिसको देख देख चांद जलता है!' चांद जलता है? Seriously??? 🤭🤭🤭 पण प्रेम हो, प्रेम!! माफ करतो बिचारा तो चंद्र ही!! पण ह्याहून height म्हणजे, 'चांद से परदा किजीए, कहीं चुरा न ले चेहरे का नूर...' अरे???!!! म्हणजे सगळं जग ज्याच्या सौंदर्यामुळे वेडं होतंय, तो चंद्र ह्याच्या प्रेयसीच्या सौंदर्याची चोरी करणार??? 🤦🏻♀️🤦🏻♀️😂😂 पण पुन्हा तेच... 'प्रेम वेडं आणि आंधळं 😜 असतं' म्हणत असेल आणि गप्प बसत असेल बिचारा!! दया येते हो बिचाऱ्याची!! हे कमी म्हणून की काय, आपल्या प्रेयसीवर impression मारण्यासाठी, चंद्र तोडून आणायची भाषा करतात हो काही माणसं... 'तुम जो कह दो तो चांद तारों को तोड लाउंगा मैं...' "जवळ तरी ये, तुझं तंगडंच तोडून ठेवतो" असं काही म्हणत असेल का हो तो चंद्र? जाऊदे, आपल्याला काय? आपल्याला तरी नाही बा कुणी कधी असं काही म्हटलं... 😜
चंद्राला वेगवेगळ्या duties सुद्धा निभावाव्या लागतात बरंका! 'ए रात के मुसाफिर चंदा जरा बता दे, मेरा कुसूर क्या है, तू फैसला सुना दे' म्हणणाऱ्या कुणासाठी कधी judge होऊन, निर्णय द्यावा लागतो किंवा मग 'चंद्र आहे साक्षीला' अशी खात्री असणाऱ्यांसाठी कधी साक्षीदार व्हावं लागतं... 'चंदा ओ चंदा, किसने चुराई तेरी मेरी निंदीया, जागे सारी रैना, तेरे मेरे नैना' असं म्हणणाऱ्या एखाद्याचा 'हमदर्द' व्हावं लागतं... कधी कधी 'दमभर जो उधर मुँह फेरे, ओ चंदा, मैं उनसे प्यार कर लुंगी, बातें हजार कर लुंगी' अशी गळ कुणी घातली की, सगळं सगळं दिसत असूनही, 'मी नाही बघत, तुमचं चालू द्या' असं कबूल करावं लागतं 😜😜 तर कधी कधी 'धीरे धीरे चल, चांद गगन में' अशी एखाद्याची हळू हळू पुढे सरकण्याची फर्माईश पूर्ण करावी लागते!
पण एकाच वेळी, जर एक जण चंद्राला 'लवकर ये' म्हणत असेल आणि दुसरा 'नको येऊ' म्हणत असेल तर काय करावं बिचाऱ्याने? 'हम दिल दे चुके सनम' मध्ये नाही का, 'चांद छुपा बादल में' गाण्यात, करवाचौथचं व्रत करून भुकेने व्याकुळलेल्या बायकांना कधी एकदा चंद्र येतोय असं झालेलं असतं तर त्याच वेळी 'एकदा चंद्र आला की आपली प्रेयसी निघून जाईल' अशा भीतीमुळे सलमानला मात्र चंद्राने येऊ नये असं वाटत असतं! 'आजा रे आजा चंदा, तू लाख दुवाएं पायेगा' म्हणणाऱ्या बायका आणि 'ना, ना, चंदा तू नही आना, वरना सनम चला जायेगा' म्हणणारा सलमान ह्यात त्या चंद्राची किती अवघड अवस्था होत असेल बरं?! मला इथे कायम 'पडोसन' ची आठवण येते! त्यात, 'एक चतुर नार' गाण्यात नाही का, मेहमूद वैतागून म्हणतो, 'ये क्या रे घोडा-चतुर, घोडा-चतुर, एक पे रहना' 😂😂 तसं तो चंद्रही म्हणत असेल, 'अरे काय रे हे, "ये", "येऊ नको", "ये", "येऊ नको" लावलंय? एक ठरवा ना काय ते!!' 🤭🤭🤭
स्वतःच्या बालपणात चंद्राला लाडाने मामा बनवून झालं, आणि तारुण्यात त्याच्या सौंदर्याला साक्षी ठेवून प्रेम व्यक्त करून झालं की पुढे आपल्या मुलांसाठी गाणी म्हणताना परत असतोच हक्काचा चंद्र!! स्वतः आई झाल्यावर, 'तुझे सूरज कहूं या चंदा, तुझे दीप कहूं या तारा, मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा' म्हणणारा बाबा किंवा 'चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरी आंखों का तारा है तू' म्हणणारी आई ही रुपं हल्ली मला जास्त भावतात!! चंद्राचा हा असा संदर्भ सगळ्यात सच्चा वाटतो! माझ्या लेकाला तर 'चंदा है तू' गाणं प्रचंड आवडतं आणि कधीही ते गाणं कानावर पडलं की, असेल तिथून पळत येऊन, तो जेव्हा माझ्या गळ्यात पडतो, तेव्हा ते गाणं, चंद्राच्या सगळ्या गाण्यांपैकी, सगळ्यात जास्त जवळचं वाटतं मला - अगदी चंद्राला कवेत घेतल्यासारखं!! 😊😊
अर्थात, ही झाली आमची सामान्य माणसाची बुद्धी! पण आपल्या संतांनी चंद्राला ह्याहून खूप उच्च स्थानावर नेऊन ठेवलंय. 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, "चंद्र" व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर' अशा शब्दात संत गोरा कुंभारांनी पांडुरंगाला आळवलं आहे आणि अभिषेकी बुवांच्या आवाजात ती आळवणी ऐकली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. चंद्राकडे बघितल्यावर पांडुरंगाला आळवण्याची बुद्धी आपल्याला अगदी आतूनच होईल तो दिवस भाग्याचा! आणि तिथवर पोहोचण्याच्या प्रवासात कितीही 'ताप' असतील तरीही ते 'साध्य' गाठल्यावर लाभणारं कृपेचं चांदणं नक्कीच खूपच 'शीतल' असेल!!!
© रश्मी पानसे - नाझिरकर
Saturday, October 8, 2022
Distances do matter...
Thursday, October 6, 2022
जीवनगाणे...
Friday, September 9, 2022
डायरीतलं पान...
Wednesday, May 27, 2020
लफ़्ज़... (शब्द)
या बस दो ही लफ़्ज़ कभी, दिल दुखानेके लिए,
बड़ी एहतियातसे कर इस्तेमाल इन्हें तू,
दो लफ़्ज़ हैं काफ़ी, ज़िंदगीका रुख़ बदलने के लिए...
असंच सुुुचलं म्हणून ह्याचंं भाषाांतर पण केेेलंय...
आणि दोनच शब्द कधी पुरेसे, नयनी अश्रू आणण्याला,
तर मग जपूनच वापरू हे शस्त्र गडयांनो,
दोनच शब्द समर्थ कधी तरी, आयुष्य संपूर्ण बदलायला...
- रश्मी
Sunday, May 24, 2020
ज़िम्मेदारी..
निखारू उसे, ज़िम्मेदारी है मेरी..
मेरे दर्द की है, दवा मेरे अंदर,
समझके, निगलना, ज़िम्मेदारी है मेरी...
फिरुनी मी...
कोंडलेल्या भावनांनी, रूप त्यांचे ल्यायले..
भाव माझेच, शब्दही अन, पण नव्याने भेटले,
काय जादू, की कृपा ही, मीच फिरुनी गवसले...
Saturday, May 23, 2020
राह-ए-जन्नत
Thursday, May 14, 2020
जागतिक कुटुंब दिन..
विविध स्वभाव, मते विविध, कुटुंब धाग्यात गोवले जाती..
आई, वडील, भाऊ, बहीण, आज्जी आबांचा लळा,
आत्या, काका, मामा, मावश्या, मायेचा गोतावळा!
रक्ताची ही नाती सगळी, सुखदुःखातील सांगाती,
आणि जणू कुटुंबच होती, काही खास मैत्र, सखे-सोबती!
कुटुंब दिनी सदिच्छा, लाभो ह्या सर्वांना सुख परम,
पुढे जमेल का कधी आचरायला, 'वसुधैव कुटुंबकम्'?!
Wednesday, May 6, 2020
दुआ
बदलेमें ख़ुदासे भी दर्द ही पाते हैं।
पर फ़ितरत तो देखो उन 'दुसरों'की,
दुआमें ऐसोंके लिये भी ख़ुशी ही मांगते हैं।।
Tuesday, May 5, 2020
झुळूक..
मुक्त वावर तिचा, ना तिला कुठलाही लॉकडाउन,
सुखद स्पर्शातून जाणीव 'त्या'च्या कृपेची दिली,
अन आली तशीच गेली, गात्र अन गात्र सुखावून...
Thursday, January 25, 2018
हम साथ साथ हैं!!
फेसबूक वरच्या एका समूहावर सध्या 'दिलेल्या पूर्वार्धावरून गोष्टीचा उत्तरार्ध लिहीणे' असा 'कथापूर्तीचा' उपक्रम सुरू आहे. त्यापैकी एक कथा पूर्ण करण्याचा केलेला हा प्रयत्न...
पूर्वार्ध:-
मयंक आणि चेतन खूप वेळ किनाऱ्यावर बसून होते. गेले कितीतरी तास दोघांचे वाद चालू होत आणि आता अगदी भयाण शांतता होतीे. त्या वादाचा आणि आताच्या शांततेचा साक्षीदार असलेला सूर्य आता डुबायला आला होता.
खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांना हळूहळू लक्षात आलं होतं की आपण दोघेही पायलवर प्रेम करतोय. पण त्या तिघांच्या पक्क्या मैत्रीमुळे दोघेही गप्प होते. एकमेकांना आजमावत होते. पायलचा अंदाज दोघांनाही येत नव्हता. कॉलेज संपून आता तिघेही आपापल्या कामाला लागले होते. तिघेही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जम बसवू लागले होते. तिघांचीही आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्तर सारखाच होता.
कॉलेजमध्ये खूप धमाल तिघांनीही केली होती. एकत्र सहलीला गेले होते, सिनेमे, नाटके पाहिली होती, प्रत्येक गोष्ट एकत्र केली होती. अगदी व्हाट्सअप्प गृप व्यतिरिक्त पर्सनल मेसेज सुद्धा केले नव्हते कधीच. एवढी तिघांमध्ये unity होती.
पण आज अचानक जेव्हा पायलच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा दोघांनाही, खरंतर तिघांनाही ती कल्पनाच सहन झाली नाही.
पायलला देखील कळत होते की दोघेही तिच्यावर प्रेम करतायत जीवापाड. तिलाही दोघे अगदी चांगले मित्र म्हणून आवडत होते. पण तिला कळत नव्हते की आपल्याला नेमकं दोघांपैकी कोण आवडतं ? दोघेही तिच्या जीवनात एकाच वेळेस आले होते. दोघेही तितकेच तडफदार, हुशार, स्मार्ट. एखाद्याला पाहून त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होणे या स्टेजच्याही आधीच तिला तिच्या मैत्रिणीकडून कळलं होतं की ते दोघेही तिच्यावर प्रेम करतायत जीवापाड. शलाकाला जे कळलं ते पायलला स्वतःहून कळलंच नव्हतं इतकी ती त्यांच्या मैत्रीत गुंगून गेली होती.
आपल्याला कोणाचे आकर्षण वाटते या विचारापाशी येऊन ती थबकायची. तिला आता मैत्री आणि प्रेम यातील फरकच कळेनासा झाला होता. विचार करून करून डोकं शिणून गेलं होतं. तिघांचे गृप फोटो सतत पाहून पाहून वेड लागायची पाळी आली होती तिच्यावर.
रात्रीचे 8 वाजले तरी nearby app मध्ये दोघांची लोकेशन्स जुहू बीच दिसत होती.
ती तडक उठली, कपडे बदलले, तिची scooty काढली आणि निघाली.
मयंक आणि चेतन दोघांनाही नोटिफिकेशन आले "payal pradhan is nearby ..."
उत्तरार्ध:-
तशी पायल थोडी फिल्मी म्हणता येईल अशीच होती. त्यामुळे गेल्या काही दिवसात तिने 'मुझसे शादी करोगी', 'साजन', 'हम दिल दे चुके सनम' वगैरे किती तरी वेगवेगळ्या movies मधले वेगवेगळे scenes स्वतःच्या आयुष्याशी जोडून पाहिले होते! आत्ताही तिला समोर तराजूच्या दोन पारड्यांमधे तिचे दोन लाडके मित्र उभे असल्यासारखे दिसत होते..
चेतन एकदम संयत, थोडासा अबोल कडे झुकणारा, कुठल्याही गोष्टीचा अगदी सर्व बाजूंनी विचार करणारा तर मयंक एकदम उत्कट, 'on an impulse' म्हणतात तसं काहीसं जगणारा - पण तरीही थिल्लर नक्कीच नाही.. सगळ्यात मुख्य म्हणजे दोघंही तिला जीवापाड जपणारे!! 'असे मित्र मिळायला खरंच भाग्य लागतं,' तिच्या मनाने तिला पुन्हा एकदा सांगितलं; 'आणि म्हणून तर त्यातल्या कुणाही एकाला दुखावणं आणि दुसऱ्याला निवडणं हे खूपच अवघड आहे,' तिनेही मनाला ठणकावून सांगितलं.. तिने काहीतरी ठरवलं तर होतं पण आता ते दोघं काय म्हणतायेत यावर सगळं काही अवलंबून होतं..
'Wassup guys? Anything serious?' पायलने पोहोचल्यावर लगेच मोर्चेबांधणी सुरू केली. 'काही बोलायचंय का तुम्हाला माझ्याशी? मला तरी तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय बा. जाऊदे, मीच बोलते.' जे ठरवलंय ते एकदा लवकर बोलून टाकायचं tension असल्यामुळे कुणालाही बोलायचा chanceच न देता पायलने सभा स्वतःच्या हातात घेतली..
'तर my dear friends, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की तुमच्या मनात काय चाललंय याची, तुम्ही सांगितलं नसलं तरी, मला पूर्ण कल्पना आहे. आणि खरं तर ना, मला पण तुम्ही दोघंही खूप आवडता रे! आपलं tuning पण कसलं भारीये!! पण 'life partner' म्हणून कुणाची निवड करावी हे खरंच मला काहीच कळेनासं झालंय.. after all, मैत्री वेगळी आणि लग्न वेगळं, नाही का? तर, असं confusion असल्यामुळे, निवड करण्यासाठी, मी एक वेगळा निर्णय घेतलाय...'
'काय स्वयंवर वगैरे रचून आम्हाला एखादा पण बिण पूर्ण करायला लावणारेस की काय?' मयंकने विचारलं.
तसं त्याला एक चापट मारत पायल म्हणाली, 'गप रे.. मी ठरवलंय की मी तुम्हा दोघांबरोबर काही दिवस 'live-in' मधे राहून बघायचं - 'चि. व चि. सौ. कां.' सारखं रे - अन मग आपलं उत्तर आपल्याला आपोआपच मिळेल...' कसंबसं वाक्य संपवून पायलने दोघांकडे एक चोरटा कटाक्ष टाकला.. आता समोरून काय येतंय या विचाराने तिचे प्राण तिच्या कानांत गोळा झाले!
थोडा वेळ एक विचित्र शांतता पसरली. नेहेमी खूप चटकन react होणारा मयंक नुसतंच तोंड उघडून परत शांत झाला. नेहेमी विचार करून, वेळ घेऊन बोलणाऱ्या चेतनने मात्र यावेळी फार वेळ न घेता लगेच बोलायला सुरुवात केली, 'पायल, मला हा प्रस्ताव मान्य नाही.'
काहीतरी बोलायसाठी तोंड उघडलेल्या पायलला थांबवून चेतन पुढे म्हणाला, 'पायल, तुला already कळलंच आहे म्हणतीयेस तरी आज मी सांगतो की "हो, मला तू खूप आवडतेस- मैत्रीच्या पलीकडे जाऊन - आणि मला तुझ्याशी लग्न करायला मनापासून आवडेल," पण तरीही मला तुझा हा प्रस्ताव मान्य नाही. आयुष्य म्हणजे movie नव्हे पायल. मुळात मला हा 'live-in' चा पर्याय कधीच पटला ही नाही आणि आवडलाही नाही. शिवाय, तू ज्या movie चा reference देतीयेस त्यात ती एकाच मुलाबरोबर राहिली होती. इथे तू दोघांबरोबर रहायचं म्हणतीयेस.. सोप्पं वाटतं का तुला सगळं? आपल्याकडे समाजात अजूनही याला फारशी मान्यता नाही; त्यात तू थोडे दिवस एका मुलाबरोबर अन मग नंतर थोडे दिवस दुसऱ्या बरोबर राहून 'बघणार'.. तुला वाटतं आपला समाज हे accept करेल? तू म्हणशील कदाचित की मला समाजाची पर्वा नाही पण लोकांनी तुला नावं ठेवलेली मला नाही आवडणार गं.. कारण माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे..'
'अरे पण,' पायलने बोलायचा प्रयत्न केला पण चेतनला अजून खूप बोलायचं होतं. तो म्हणाला, 'बरं, समज, तुला या प्रयोगानंतर आम्हा दोघांपैकी कुणाच बरोबर कायमचं राहावंसं नाही वाटलं तर? आमच्या दोघांपैकी कुण्या एकाचा तू स्वीकार केलास तर तो कदाचित तुझं दुसऱ्या बरोबर 'राहून बघितलेलं असणं' समजून घेईलही; पण दोघांनाही निवडलं नाहीस तर तिसराच कुणी तुला तसंच समजून घेईल? आहे तुला ती खात्री?'
'आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या बरोबर राहून बघितल्या नंतर ज्या अर्थी एकाला तुला reject करावंसं वाटेल त्या अर्थी तुझं अन त्याचं कमी पटेल; मग नंतर ही मैत्री अशीच टिकून राहू शकेल? मी तरी खरंच हे सहन नाही करू शकणार गं..
So, better way, मी तुला suggest करतो की तू मयंकशी लग्न कर.. माझ्यासाठी तुम्हा दोघांचीही मैत्री खूप महत्त्वाची आहे आणि मला ती आयुष्यभर हवीये.. so, नंतर काहीतरी न पटून एकमेकांपासून कायमचं लांब जाण्यापेक्षा आज प्रेमात माघार घेऊन मैत्री जपायला मला आवडेल..'
पहिल्यांदाच चेतन इतकं बोलला असेल.. त्याला आलेला ताण त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत असला तरी आता तो बराच शांत झाला होता..
'तोडलंस मित्रा!' मयंक घोगऱ्या आवाजात म्हणाला. त्याचे डोळे चक्क पाणावले होते. 'पायल, आता प्लीज माझं म्हणणं ऐक. मी मनापासून सांगतोय की चेतन हाच तुझ्यासाठी right choice आहे! खरंच चेतन, तुझ्या त्यागाची परतफेड करण्यासाठी नाही पण तुझं बोलणं ऐकल्यावर मला जाणवलं की मी इतका विचारच केला नाही; rather पायलने तिचं proposal मांडल्यावर पहिल्यांदा तर मला पण भारीच idea वाटली ती! त्याच्या पुढच्या सगळ्या परिणामांबद्दल एवढा विचारच आला नाही माझ्या मनात.. पण स्वतःचं प्रेम नाही मिळालं तरी चालेल पण ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिचा जास्ती विचार करणे हेच तर खरं प्रेम! पायल, मैत्रीसाठी माझ्यासारखं हाहाहीही ठीके पण आयुष्यभरासाठी चेतन सारखी mature साथ च हवी.'
'मयंक, तू उगाच स्वतःला काहीतरी नावं ठेवू नकोस हां,' पायल आणि चेतन एकत्रच म्हणाले.
'बघा, तुमचे विचार पण किती जुळतायेत!' मयंक हलकंसं चिडवत म्हणाला. 'यार, माझ्यासाठी आपली ही मैत्रीच खास आहे! अन प्रेमाच्या आघाडीवर पायल अन चेतन कडून थोडंसं दुःख मिळाल्यासारखं वाटलंच पहिले काही दिवस तरी सांभाळून घ्यायला मित्र म्हणून पायल अन चेतन आहेतच की!! हम लोग तो हमेशा साथ ही रहेंगे!! So guys, I am really happy for you!! मग, पायल, शोले मधल्या अमिताभ सारखं, चेतन च्या वतीने लग्नाची बोलणी करायला कधी येऊ?'
सगळ्या मित्रांच्या खळखळून हसण्यात एवढ्या दिवसांची tensions कुठल्या कुठे पळून गेली!
मागे कुठल्याशा स्टॉल वर गाणं लागलं होतं, 'यारों, दोस्ती बडी ही अजीब हैं.......'