प्रिय आशाताई,
तुम्ही जवळपास माझ्या आज्जीच्या वयाच्या खरंतर... पण तरीही तुमच्याबद्दल बोलताना आशाताई - किंवा कधीकधी तर आशा - असंच म्हणायची सवय आहे. प्रत्यक्ष भेट नसली तरी मनातून जवळीकच तितकी!! त्यामुळेच आम्ही 'अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही' म्हणत असताना, तुम्ही मात्र 'यही कहोगे तुम सदा की दिल अभी नही भरा' असं म्हणत निघूनच गेलात ही कल्पनाही सहन होत नाहीये... काही माणसांचं असंच असतं ना? ती प्रत्यक्ष तुम्हाला भेटलेली नसतात किंवा अगदी रोजच त्यांचा विषय निघत असेल असंही नसतं... पण तरीही जगाच्या पाठीवर, कुठल्यातरी कोपऱ्यात ती आहेत एवढी नुसती भावनाही आनंददायी असते, दिलासादायक असते... पण आज तो कोपराच कायमसाठी सुना झालाय...
तुमच्या गाण्यांनी माझ्या आज्जीच्या पिढीलाही भुरळ घातली, आईच्याही, माझ्याही आणि आता तर माझ्या लेकाच्याही!! चार पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणे ही काही साधीसुधी गोष्ट नक्कीच नाही.. लहानपणापासून तुमची गाणी ऐकतच आम्ही मोठे झालो आणि कदाचित असं म्हटलं तरी चूक ठरू नये की मला गाण्यांची इतकी प्रचंड आवड निर्माण होण्यात तुमच्या गाण्यांचा खूपच मोठा वाटा आहे!!!
भजनं, अभंग, भक्तीगीतं, बालगीतं, भावगीतं, प्रेमगीतं, विरहगीतं, मुजरा गीतं, लावण्या, कॅब्रे, डिस्को..... कुठलाच प्रकार नाही ज्याला तुमचा परीसस्पर्श झाला नाही... आणि प्रकार कुठलाही असो, तुम्ही त्यात जीव ओतल्याशिवाय राहिला नाहीत... बर, हे तर झालं गाण्यांमधलं; पण तुमचं पाककलाप्रेम आणि नैपुण्यही प्रसिद्ध... वयाच्या 83व्या वर्षी चित्रपटात अभिनयही केलात... किती active असावं एखाद्याने! उगीच नाही आशा भोसले म्हणजे versatility हे समीकरण फिट्ट बसलेलं आमच्या डोक्यात!!
काल रात्रीच आमच्या सोसायटीमध्ये गाण्यांचा कार्यक्रम होता... Solo plus duet मिळून मी गायलेल्या 7 गाण्यांपैकी 4 गाणी तुमची होती!!! पु. लं. च्या भाषेत सांगायचं तर 'उगाच आपलं उंटाच्या शेपटाच्या बुडख्याचा मुका घेण्याचं काम'! पण काय करणार, जास्ती आवडतात तुमचीच गाणी... अर्थात त्यावेळी खरंच कल्पनाही नव्हती की 24 तासांच्या आत ह्या गाण्यांची खरी साम्राज्ञी आपल्याला सोडून जाणार आहे... कुणाला माहीत होतं की आमची गाणी म्हणजे एकप्रकारे तुम्हाला tribute ठरणार आहे!!!!!!
तुमची गाणी म्हणण्याचं धारिष्ट्य करण्याचं स्वप्न तर बरेचदा पूर्ण झालंय, पण हृदयाच्या कप्प्यात अगदी खोलवर जपलेलं माझं एक स्वप्न मात्र आता कायमचंच अपूर्णच राहणार... खूप इच्छा होती एकदा तरी तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची - म्हणजे निदान बघण्याची तरी... Live कार्यक्रमाला येणं कधीच जमलं नाही आणि कुठेतरी तुम्ही येणार असलेल्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योगही कधीच आला नाही... तुमचंच एक गाणं फार आठवतंय आत्ता - "सपना मेरा टूट गया..." 🥹🥹🥹
तुमचं नाव 'आशा'... आणि मी पहात आलेय तसा तुमचा स्वभावही प्रचंड आशादायी, प्रचंड सकारात्मक...जणू उत्साहाचा खळाळता झरा!!! तुमच्या अनेक मुलाखतींमधून, तुमच्या live कार्यक्रमांमधून आयुष्याकडे बघण्याचा तुमचा सकारात्मक, आनंदी दृष्टिकोन कायमच जाणवायचा, आणि त्यामुळेच "आशा भोसले" ह्या 'institute' च्या आणखीच प्रेमात पडायला व्हायचं!!! एका कार्यक्रमात तुम्ही म्हणाला होतात की 'माझं नाव आशा आहे, त्यामुळे उद्या मी ह्या जगातून गेले तरी "आशा" कायमच जिवंत राहील'! किती आशादायी विचार!!
आणि तुम्ही स्वतः, दुःखातही, अशा कायम हसरा चेहरा ठेवून वावरणाऱ्या, रडत न बसणाऱ्या असल्यामुळे, आज तुम्ही गेल्यावर आम्ही रडत बसणं, दुःखी चेहरे करणं तुम्हाला नक्कीच आवडणार नाही - तुमच्या आठवणींचा अपमान होईल तो... त्यामुळे आता शिकलं पाहिजे हसऱ्या चेहऱ्याने निरोप देणं...
असं म्हणतात की कलाकार हे खरंतर त्यांच्या कलाकृतींच्या रुपानेच जगत असतात.. त्यामुळे शरीराने नसलात तरी तुमच्या अप्रतिम गाण्यांच्या रूपाने अजूनही तुम्ही आहातच... आणि प्रत्यक्षात नसेल तरी त्या गाण्यांच्या माध्यमातून रोजच्या रोज तुम्हाला भेटत रहायचं माझं स्वप्न कधीच मोडू शकत नाही!!!!
तुमच्या मर्त्य रूपाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि बाकी ..... "उरले उरात काही आवाज चांदण्यांचे"!!!!!
रश्मी पानसे - नाझिरकर