"आई, please गं... नुसतं उतरवूनच तर काढायचंय, please, गाणी ऐकत ऐकत करू मी? प्लीsssज??" अशी लेकाकडून येणारी फर्माईश वाढत चाललीय हल्ली; आणि 'आई' म्हटल्यावर 'अशा गोष्टींना पहिले नाहीच म्हणायचं असतं' 😜 हा अलिखित नियम follow करण्यासाठी थोडी चिडचिड करून, (का केल्यासारखी दाखवून? 🤔) मग 'उदारपणे' 😜 परवानगी देताना, मनात मात्र कुठेतरी मला खूप भारी वाटतं, माहितीये?!! कारण, माझा लेकही माझ्यासारखाच गाण्यांचा शौकीन होतोय ही गोष्ट मला खूप सुखावणारी आहे!!
खरंच, मलाही कुणी माझा छंद विचारला तर माझं पहिलं उत्तर असतं - 'गाणी'!!! मग गाणी ऐकणं असेल, गुणगुणणं असेल किंवा काही cases मध्ये, गाणी बघणंही असेल... गाणी म्हणजे जीव की प्राण!!
'संगीत है शक्ती ईश्वर की, हर सूर में बसे है राम!' हे आता मला कितीही सुयोग्य वगैरे वाटत असेल तरी, असलं काही कळण्याच्याही आधीपासून, संगीत मला खूप म्हणजे खूप जवळचं वाटत आलंय. आणि खरंतर, मलाच काय, जवळजवळ प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या प्रकारचं संगीत भुरळ घालतच असणार - संगीताचा जिला अगदी तिटकाराच असेल अशी व्यक्ती बहुदा नसेलच...
लहानपणापासून गाण्यांची एवढी आवड निर्माण होण्यात आणि, गळा असो ना असो, पण 'चांगला कान' तयार होण्यात माझ्या आई-बाबांचा वाटा नक्कीच मोठा आहे. खूप चांगली चांगली, वैविध्यपूर्ण गाणी खूप लहानपणापासून माझ्या कानावर पडत आली आहेत. ह्यात radio चा ही मोठा हातभार होता. आज खरंतर radio ची कितीतरी stations उपलब्ध आहेत पण आता पूर्वीसारखा radio ऐकलाच जात नाही, हे मात्र दुःख आहे.
शाळेत असताना आईने गाण्याच्या class ला ही घातलं होतं - 'मी class ला जात होते' पेक्षा 'आईने घातलं होतं' हेच वाक्य जास्त बरोबर ठरेल, कारण त्या वेळी गाणी म्हणजे सुगम गीतं, भावगीतं, filmy गाणी असंच फक्त हवं असायचं. ताना, आलाप, चीजा, ख्याल वगैरे जवळचे वाटायचेच नाहीत फारसे... त्यामुळे classical शिकणं फार काही मनापासून व्हायचंच नाही आणि मग पुढे अभ्यास वगैरे वाढत गेल्यावर आपोआपच ते बंद ही पडलं. आता मात्र त्याबद्दल खूप खंत वाटते. आणि तरीही, आज मला कुठल्या रागात कुठले सूर आहेत वगैरे काहीही आठवत नसलं तरीही, ऐकताना मनाच्या तारा मात्र नक्की छेडल्या जातात!! ☺️☺️
गाण्यांच्या बाबतीत खरंतर नुसती आवड म्हणणं चूकच ठरेल, गाण्यांचं वेड आहे मला!! म्हणूनच, मला आठवतंय, माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या एका बहिणीने मला विचारलं होतं, 'त्याला पण गाण्यांची आवड आहे का गं, आपल्यासारखीच?' 🤭🤭🤭 म्हणजे, नवीन नातं जोडतानाही गाणं हा किती महत्वाचा मुद्दा होता!! 'जे वेड मजला लागले, तुजला ही ते लागेल का?' हे अशा अर्थाने असू शकेल असं आधी वाटलं नव्हतं हो! 😜
माझ्या लहानपणी मी आईला कायम 'एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख' गाणं म्हणून दाखवायला लावायचे, अगदी मुसमुसत का होईना पण मला ते गाणं ऐकायचं असायचं... आणि ईशानच्या लहानपणीही अगदी तेच घडलं!! माझं लेकरू हे गाणं ऐकताना मुसमुसायचं पण त्याला ते गाणं हवं असायचं!! तेव्हाचा आनंद काय सांगू!!! धन्य झाले हो मी!! 🥰🥰🥰 'जे वेड मजला लागले' ते माझ्या लेकालाही लागलंय बहुदा!!
मला स्वतःला धांगडधिंग्यापेक्षा शांत, melodious songs जास्ती आवडतात. गाणी हळुवारपणे मनात झिरपत जावीत हे जास्त आवडतं मला! आणि त्यासाठी, music च्या जोडीलाच गाण्याच्या lyrics ला ही खूपच महत्व असतं. गाणं ऐकताना, नुसते त्यातले beats किंवा rhythm च ऐकण्याऐवजी अर्थ ही feel करत गेलो, तर ते गाणं नक्की जास्त भावतं!
अर्थात, कधी कुठलं गाणं मनाला स्पर्शून जाईल ह्याचे काही fix ठोकताळे मांडताच येणार नाहीत. मुळात, संगीत ह्या कलेचा आपल्या मनाशी, भावनांशी जास्त जवळचा संबंध असल्यामुळे आपल्या, त्या त्या वेळच्या, mood नुसारही आपल्याला वेगवेगळी गाणी जवळची वाटतात... एखादं खूप आवडणारं गाणं पण एखादे वेळी 'नको ऐकायला' असं वाटतं तर एखादं दुर्लक्षित गाणंही कधीतरी एकदम खास वाटून जातं! सगळे मनाचे खेळ!!
आपल्या नशिबाने, इतक्या मुबलक प्रमाणात आणि इतकी प्रचंड वैविध्यपूर्ण गाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत की आयुष्यातल्या, जवळजवळ, प्रत्येक प्रसंगाला साजेसं गाणं आपल्याला मिळू शकतं - मग तो आनंदाचा असो नाहीतर दुःखाचा. आनंदात असू तर आपला आनंद द्विगुणित करणारी गाणी आहेत आणि दुःखात असू तर त्यातून बाहेर काढणारीही गाणी आहेत! अपयश, नैराश्य ह्यांना कुरवळणारी गाणी जशी आहेत तशीच त्यातून बाहेर पडण्यासाठी उभारी देणारीही गाणी आहेत! आयुष्याला उत्सव बनवणारी गाणी आहेत तशीच मृत्यू साजरा करणारीही गाणी आहेत! आपण फक्त आपला कान तयार ठेवला की झालं!
मी म्हटलं तसं, प्रत्येक भावनेसाठी, प्रत्येक प्रसंगासाठी गाणी असतातच आणि त्यात प्रेम आणि गाणी ह्यांच्या जोडीबद्दल तर क्या कहने!! 😄😄
आयुष्यात प्रेमाची entry होण्याआधीच, कुणीतरी असावं असं नुसतं वाटण्यापासून गाण्यांची साथ असते - "हमको आजकल है इंतजार, कोई आये ले के प्यार" आठवतंय ना?! किंवा मग, "कोई ना कोई चाहिये, प्यार करनेवाला..."
मग कुणीतरी आवडलंयसं वाटलं की तर विचारायलाच नको... किती ती स्वप्नील गाणी!! "दिल तेरे बिन कहीं लगता नही, वक्त गुजरता नही... क्या यही प्यार है?" अशी अधीर अवस्था!!
आणि समोरूनही "हां, यही प्यार है" असं उत्तर मिळून, एकतर्फीची गाडी proper रुळाला लागल्यावर तर बासच!! "हमें तुमसे प्यार कितना ये हम नही जानते, मगर जी नही सकते, तुम्हारे बिना..."
काय ती धुंदी, काय ती जादू, औरच ते दिवस!! अगदी "आज मैं उपर, आसमाँ नीचे" अशी अवस्था...
दोघांनी घेतलेल्या आणाभाका, कायम एकत्र राहण्याची वचनं... "वादा कर ले साजना, तेरे बिना मैं ना रहू, मेरे बिना तू ना रहे, होके ज्युदा, ये वादा रहा"...
मधेच थोडे रुसवे-फुगवे, मग मनवणं... "तू रुठा तो मैं रो दुंगी सनम"... किंवा "कोई हसीना जब रूठ जाती है तो"...
मग दोघांनी मिळून बघितलेली स्वप्नं... "देखो मैने देखा है ये एक सपना, फ़ुलों के शहर में हो घर अपना"...
आणि मग काहीतरी फिस्कटलं की तर breakup songs ऐकलीच पाहिजेत - शास्त्र असतं ते! 😜😜😜 "दिल मेरा चुराया क्यों, जब ये दिल तोडना ही था... why did you break my heart???"
आठवडाभर तरी, 'देवदास' बनून, चुनचुनके तसली गाणी ऐकल्याशिवाय प्रेमभंग पूर्ण होतच नसतो!! 😂😂😂
मग परत 'जिंदगी', 'जीवन' वगैरे वाली philosophical गाणी ऐकून हळू हळू त्यातून बाहेर पडायचं... "रूक जाना नही, तू कहीं हारके, काटों से चलके मिलेंगे सायें बहार के!"
आणि मग परत "हे जीवन सुंदर आहे!" असं म्हणत डोळ्यांना परत आजूबाजूला हिरवळ दिसू लागते!! 😜😜😜
हे खरंतर खूप म्हणजे खूपच थोडक्यात मांडायचा प्रयत्न केलाय, ह्या विषयावर एक खास वेगळं article नक्की होऊ शकेल!! 😄
अर्थात, प्रेम हा विषय सोडूनही इतर कितीतरी गाणी, आपल्याला अगदी जवळची वाटावीत अशी असतात. भक्तीसंगीत, देशभक्तीपर गाणी, मैत्रीची गाणी, बालगीतं, अंगाईगीतं, गझल, कॅब्रे... कित्ती कित्ती प्रकार आणि कित्ती कित्ती गाणी... कधी उडते सूर तर कधी आर्त सूर... कधी वरची पट्टी तर कधी खोल खर्ज... कधी साधी सरळ तर कधी अवघड सुरावटींची... आणि मनापासून ऐकलंत तर जाणवेल की, शब्द, संगीत, आवाज ह्या सगळ्यांचा सुंदर मिलाप घडून आला असेल तर दोन ओळी ऐकूनही डोळ्यांमधून पाणी यायला लागतं - अगदी आनंदी गाण्यालाही हां - ती ते गाणं आपल्याला 'feel होण्याची', त्या कलेची परमोच्च अवस्था असते!! खूप म्हणजे खूप सुंदर भावना असते हो ती!! 🥰🥰🥰
आपलं आयुष्यही असंच तर आहे!! किती विविधता, किती अवघड जागा... कधी आनंद तर कधी आर्तता... कधी साधं सरळ तर कधी खूप किचकट... वरचे, खालचे, शुद्ध, कोमल सगळे स्वर लावावे लागतात आयुष्यात, पण तरीही, जेव्हा आपण जिद्दीने, सचोटीने, प्रामाणिकपणे सगळं हाताळतो, तेव्हा आयुष्याचं सुरेल गाणं बनून जातं!!
आपला पहिला स्वर आपल्या हातात नसतो, शेवटच्या स्वराच्या वेळी आपली अवस्था काय असेल, कुणास ठाऊक... पण ह्या दोन स्वरांच्या मधले सगळे सूर जर आपण मनापासून लावले, तर खरंच आपल्या आयुष्याची सुरावट नक्कीच श्रवणीय होईल!! आपण फक्त "जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे...!!"