Friday, October 14, 2022

चंदा है तू!!!

कोजागरी पोर्णिमा आहे, हातात दुधाचा ग्लास आहे, आकाशातला पूर्ण चंद्र आणि त्याचं चांदणं मनाला वेड लावतंय... आणि अशा वेळी गाणी आठवली नाहीत तर तो 'foul' धरतात म्हणे! कुठल्याही संगीतप्रेमी माणसाला अशा वेळी आपोआपच स्फुरण चढेल!

काल असंच त्या चंद्राकडे बघताना मनात विचार आला, की चंद्र आपल्याला जास्त जवळचा वाटायला लावला तो ह्या गाण्यांनीच! हे असं म्हणणं खरंतर तसं धाडसाचंच आहे आणि त्यासाठी मी चंद्राची अगदी मनापासून माफीही मागते. चंद्राचं शीतल, मनाला भुरळ पाडणारं सौंदर्य नक्कीच निर्विवाद आहे; पण तरीही ह्या गाण्यांनी चंद्राशी आपलं काही ना काहीतरी नातं जोडून दिलं - तो कुणाचा मामा तर कुणाचा भाऊ, कुणाचा सखा तर कुणाचा जिवलग, कुणाचा साक्षीदार तर कुणाचा हमदर्द झाला... कुणाकुणाचा तर प्रतिस्पर्धी देखील! आणि ही किमया नक्कीच गाण्यांचीच!

अगदी लहानपणापासून चंद्राने आपल्या भावविश्वात स्थान पटकावलेलं असतं. 'चांदोबा, चांदोबा, (चांदोमामा, चांदोमामा) भागलास का?' हे बडबडगीत ऐकलं नसेल असं एकही मराठी मूल नसेल. पिढ्यानपिढ्या तो चंद्र आपला निंबोणीच्या झाडामागे लपत राहतो बिचारा! पण फक्त मामाच नाही बरका, हा चंद्र कधीकधी "गुरुजी" ही बनतो आणि वाऱ्याच्या विमानात बसून मुलं चांदोबा गुरुजींची शाळा बघायला गगनाची सहल करून येतात. 'चांदोबा, चांदोबा भागलास का?' असो नाहीतर 'ह्या वाऱ्याच्या बसुनी विमानी' असो, हल्लीच्या animations मुळे ही गाणी जास्ती आकर्षक बनली आहेत! 'चंदा राणी, चंदा राणी, का गं दिसतेस थकल्यावाणी?' ह्या बालगीतात तर चंद्राचा उल्लेख स्त्रीलिंगी केलेला आहे! 

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चंद्राचं आकर्षण असतं हे जरी खरं असलं तरी त्याच्यावर जास्त हक्क मात्र तरुणाईचा आणि त्यातही प्रेमी युगुलांचाच!! चंद्रामध्ये त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसतो किंवा मग तो चेहराच चंद्र वाटायला लागतो!! मला तर वाटतं की उपमा किंवा रूपक ह्या दोन्ही अलंकारांसाठी सर्वात जास्त वापरला गेलेला शब्द असेल चंद्र!! 'ये चांद सा रोशन चेहेरा' असो, नाहीतर 'चेहेरा है या चांद खिला है' असो...  'एक लाजरा न साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं' असो, नाहीतर 'चांद माझा हा हासरा' असो... कालिदासपासून ते आजच्या एखाद्या, नुकतीच कविता लिहायला लागलेल्या, कवीपर्यंत प्रत्येकाला, प्रेम व्यक्त करताना, कधी ना कधी चंद्राने भुरळ घातलीच आहे. 

बर फक्त आपल्या प्रिय व्यक्तीचं कौतुक करण्यापुरतं हे मर्यादित असतं तरी ठीक होतं; पण चंद्राशी जवळीक इतकी वाढली की हळूहळू चंद्राशी तुलना करून, वर त्याला कमी लेखण्याचंही धाडस करू लागली हो माणसं! 'छुप गया बदली में जाके चांद भी शरमा गया...'  किंवा 'ए चांद, तेरी चांदनी की कसम, मेरे पास भी एक चांद है, तुझ में तो फिर भी दाग है, मेरा चांद तो बेदाग है'... किंवा मग, 'आसमाँ कहता है रब से, तुने चांद दो क्यों बनाए, एक में रखा है दाग, दुसरा है साफ साफ, सबकी नजर उस पे जाये, वो ही तो है, मेरी है वो ही तो, के जिसको देख देख चांद जलता है!' चांद जलता है? Seriously??? 🤭🤭🤭 पण प्रेम हो, प्रेम!! माफ करतो बिचारा तो चंद्र ही!! पण ह्याहून height म्हणजे, 'चांद से परदा किजीए, कहीं चुरा न ले चेहरे का नूर...' अरे???!!! म्हणजे सगळं जग ज्याच्या सौंदर्यामुळे वेडं होतंय, तो चंद्र ह्याच्या प्रेयसीच्या सौंदर्याची चोरी करणार??? 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️😂😂 पण पुन्हा तेच... 'प्रेम वेडं आणि आंधळं 😜 असतं' म्हणत असेल आणि गप्प बसत असेल बिचारा!! दया येते हो बिचाऱ्याची!! हे कमी म्हणून की काय, आपल्या प्रेयसीवर impression मारण्यासाठी, चंद्र तोडून आणायची भाषा करतात हो काही माणसं... 'तुम जो कह दो तो चांद तारों को तोड लाउंगा मैं...' "जवळ तरी ये, तुझं तंगडंच तोडून ठेवतो" असं काही म्हणत असेल का हो तो चंद्र? जाऊदे, आपल्याला काय? आपल्याला तरी नाही बा कुणी कधी असं काही म्हटलं... 😜

चंद्राला वेगवेगळ्या duties सुद्धा निभावाव्या लागतात बरंका!  'ए रात के मुसाफिर चंदा जरा बता दे, मेरा कुसूर क्या है, तू फैसला सुना दे' म्हणणाऱ्या कुणासाठी कधी judge होऊन, निर्णय द्यावा लागतो किंवा मग 'चंद्र आहे साक्षीला' अशी खात्री असणाऱ्यांसाठी कधी साक्षीदार व्हावं लागतं... 'चंदा ओ चंदा, किसने चुराई तेरी मेरी निंदीया, जागे सारी रैना, तेरे मेरे नैना' असं म्हणणाऱ्या एखाद्याचा 'हमदर्द' व्हावं लागतं... कधी कधी 'दमभर जो उधर मुँह फेरे, ओ चंदा, मैं उनसे प्यार कर लुंगी, बातें हजार कर लुंगी' अशी गळ कुणी घातली की, सगळं सगळं दिसत असूनही, 'मी नाही बघत, तुमचं चालू द्या' असं कबूल करावं लागतं 😜😜  तर कधी कधी 'धीरे धीरे चल, चांद गगन में' अशी एखाद्याची हळू हळू पुढे सरकण्याची फर्माईश पूर्ण करावी लागते!

पण एकाच वेळी, जर एक जण चंद्राला 'लवकर ये' म्हणत असेल आणि दुसरा 'नको येऊ' म्हणत असेल तर काय करावं बिचाऱ्याने? 'हम दिल दे चुके सनम' मध्ये नाही का, 'चांद छुपा बादल में' गाण्यात, करवाचौथचं व्रत करून भुकेने व्याकुळलेल्या बायकांना कधी एकदा चंद्र येतोय असं झालेलं असतं तर त्याच वेळी 'एकदा चंद्र आला की आपली प्रेयसी निघून जाईल' अशा भीतीमुळे सलमानला मात्र चंद्राने येऊ नये असं वाटत असतं! 'आजा रे आजा चंदा, तू लाख दुवाएं पायेगा' म्हणणाऱ्या बायका आणि 'ना, ना, चंदा तू नही आना, वरना सनम चला जायेगा' म्हणणारा सलमान ह्यात त्या चंद्राची किती अवघड अवस्था होत असेल बरं?! मला इथे कायम 'पडोसन' ची आठवण येते! त्यात, 'एक चतुर नार' गाण्यात नाही का, मेहमूद वैतागून म्हणतो, 'ये क्या रे घोडा-चतुर, घोडा-चतुर, एक पे रहना' 😂😂 तसं तो चंद्रही म्हणत असेल, 'अरे काय रे हे, "ये", "येऊ नको", "ये", "येऊ नको" लावलंय? एक ठरवा ना काय ते!!' 🤭🤭🤭 

स्वतःच्या बालपणात चंद्राला लाडाने मामा बनवून झालं, आणि तारुण्यात त्याच्या सौंदर्याला साक्षी ठेवून प्रेम व्यक्त करून झालं की पुढे आपल्या मुलांसाठी गाणी म्हणताना परत असतोच हक्काचा चंद्र!! स्वतः आई झाल्यावर, 'तुझे सूरज कहूं या चंदा, तुझे दीप कहूं या तारा, मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा' म्हणणारा बाबा किंवा 'चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरी आंखों का तारा है तू' म्हणणारी आई ही रुपं हल्ली मला जास्त भावतात!! चंद्राचा हा असा संदर्भ सगळ्यात सच्चा वाटतो! माझ्या लेकाला तर 'चंदा है तू' गाणं प्रचंड आवडतं आणि कधीही ते गाणं कानावर पडलं की, असेल तिथून पळत येऊन, तो जेव्हा माझ्या गळ्यात पडतो, तेव्हा ते गाणं, चंद्राच्या सगळ्या गाण्यांपैकी, सगळ्यात जास्त जवळचं वाटतं मला - अगदी चंद्राला कवेत घेतल्यासारखं!! 😊😊

अर्थात, ही झाली आमची सामान्य माणसाची बुद्धी! पण आपल्या संतांनी चंद्राला ह्याहून खूप उच्च स्थानावर नेऊन ठेवलंय. 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, "चंद्र" व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर' अशा शब्दात संत गोरा कुंभारांनी पांडुरंगाला आळवलं आहे आणि अभिषेकी बुवांच्या आवाजात ती आळवणी ऐकली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. चंद्राकडे बघितल्यावर पांडुरंगाला आळवण्याची बुद्धी आपल्याला अगदी आतूनच होईल तो दिवस भाग्याचा! आणि तिथवर पोहोचण्याच्या प्रवासात कितीही 'ताप' असतील तरीही ते 'साध्य' गाठल्यावर लाभणारं कृपेचं चांदणं नक्कीच खूपच 'शीतल' असेल!!!


© रश्मी पानसे - नाझिरकर

2 comments:

  1. खूप मस्त लिहीले आहेस...सुंदर सुंदर गाणी अप्रतिम रीत्या एकत्र गुंफली आहेत...खूप आवडलं लेखन....!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much, काका!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

      Delete