ऊन्हाळा सुरु झालाय.. भर दुपारी १२ वाजता, लेकाला अगदी शेजारीच असलेल्या शाळेतून घेऊन येताना सुद्धा, उन्हाच्या झळांनी जीव हैराण होतो. त्यात पण अख्खा 'एक' मजला उतरायचा आणि चढायचा म्हणजे काय खाऊ आहे?! आज पण जरा जीवावर आल्यासारखंच घराबाहेर पडले. खाली बिल्डिंगच्या गेटपाशीच दाते काका भेटले - रोजच्यासारखंच लेकीला शाळेत सोडून, येताना भाजी वगैरे घेऊन आलेले. रोजच्यासारखंच हसून, 'काय, कसं काय? ईशानला आणायला चाललीस का?' म्हणत ते बिल्डिंगमधे शिरले आणि मी शाळेची वाट धरली. आमचा हा जवळ जवळ नित्यपाठच! पण आज तक्रारीच्या मूडमधे बाहेर पडलेल्या मला कुणीतरी थोबाडीत मारून जागं केल्यासारखं झालं!
दाते काका! वय सत्तरीच्या पुढचं. आणि रोज ज्या लेकीला शाळेत सोडून येतात तिचं वय चाळिशीच्या पुढचं!! हो, काकांची लेक मतिमंद आहे. म्हणजे अगदी टोकाची मतिमंद नाही तरी 'गतिमंद'च्या थोडी पुढचीच केस. चाळिशीच्या पुढची ही 'मुलगी' युनिफॉर्म घालून, पाठीवर दप्तर घेऊन शाळेला जाताना दिसली की आत कुठेतरी कससंच होतं; पण त्याहून जास्ती माझा जीव कळवळतो तो काकांना बघून. लिफ्ट नसलेल्या आमच्या बिल्डिंगमधे 'चौथ्या' मजल्यावर हे दाते कुटुंब रहातं. काका, काकू आणि ही त्यांची एकुलती एक लेक. काकूंची तब्येत तशी कायमच नरमच असते - मला तरी वाटतं त्यात वयापेक्षाही 'मानसिक फॅक्टर' जास्ती असावा. त्या फारशा कधी घराबाहेर पडतच नाहीत. त्यामुळे घरातला एकमेव 'खंदा सदस्य' म्हणजे सत्तरीच्या पुढचे काका! लेकीला सोडणे-आणणे, बँकांची कामं, बिलं भरणे, भाजीपाला आणणे, औषधपाणी - सगळ्यासाठी काकाच खाली उतरतात - हो, अख्खे चार मजले आणि ते पण ऊन्हाळा असो वा पावसाळा.. आणि परत, जाता येता, दिसेल त्याच्याशी हसून चार शब्द बोलल्याशिवाय कधी पुढे जाणार नाहीत!! कसं काय जमत असेल त्यांना हे सगळं?
काका-काकू दोघांनीही वाट्याला आलेली परिस्थिती स्वीकारली असली (स्वीकारण्याशिवाय काही पर्याय ही नाही म्हणा) तरी काकूंचं दुःख बरेचदा त्यांच्या बोलण्यातून बाहेर दिसत राहतं. काका मात्र कधी स्वतःचं दुःख उघड होऊ देत नाहीत. मला आठवतंय, मी लग्न होऊन या बिल्डिंगमधे राहायला आले आणि हळूहळू एक-एक ओळखी करून घ्यायला सुरुवात झाली. Usually, पहिले लहान मुलांशी ओळखी होतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांशी. त्यातून, आम्हाला दोघांनाही लहान मुलांची खूप आवड असल्याने लवकरच बिल्डिंग मधल्या सगळ्या बालचमूला आमचं घर म्हणजे एक हक्काचा अड्डाच झालेला. या सगळ्यांबरोबरच यायला लागली दाते काकांची लेक आरती पण. ती त्यांच्यातच खेळते, वावरते. पहिल्यांदा ती आली तेव्हा मला तिच्याबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे थोडासा अवघडलेपणा आला होता; पण लवकरच इतर सगळ्यांप्रमाणे तीही आमच्यात मिसळून गेली. पण ती आमच्याकडे यायला लागल्याच्या दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी काकूंनी मला फोन केला होता आणि म्हणाल्या, 'आमची आरती तुझ्याकडे येते ना गं? चालेल ना तुला? तिला समज जरा कमी आहे हो. सांभाळून घे बाई.' सर्र्कन काटा आला होता माझ्या अंगावर! आपलं लेकरू चारचौघांसारखं नाही, त्याला काही कळत नाही हे सांगताना कुठल्याही आईबापाला किती यातना होत असतील! तेव्हा मी अजून आई झाले नव्हते तरीही एका आईचं दुःख मला खूप आतपर्यंत हलवून गेलं. काका मात्र दिसले की हसून बोलायचे, 'आरती तुमच्याकडून आली की सारख्या तुमच्याचबद्दलच्या गप्पा मारत असते हो!' असं कौतुकाने सांगायचे. काकूंचं सरळ सरळ दुःख व्यक्त करणं आणि काकांचं हसून दुःख लपवणं, दोन्हीही खूप परिणाम करून जायचं..
पुढे, ईशान झाल्यावर तर काकू-काकांची व्यथा मला खूप जवळून जाणवायला लागली. चार माणसात आपल्या लेकाचं कौतुक झाल्यावर त्याच्या स्वतःपेक्षा आईबापाचाच सुप्त अहं कुठेतरी सुखावत असतो! आपल्या बाळाने चारचौघात उठून दिसावं, आपल्या बाललीलांनी जमलेल्यांना हसवावं आणि सगळ्यांकडून शाबासकी मिळवावी यात खरंच किती सुख असतं! पण आपलं मूल हे या अशा पद्धतीने चारचौघात वेगळं उठून दिसत असेल तर त्याचा कुणाला आनंद होईल? आणि हे आता आयुष्यभर असंच राहणार आहे हे स्वीकारणं खरंच कित्ती अवघड असेल! शिवाय आरतीच्या बाबतीत बघितलं तर तिला तसं बरंच समजतं, आसपासच्यांच्यात मिसळायचं असतं. त्यामुळे यांची कायम दुहेरी कसरत! तिला ज्यांच्यात मिसळायचंय त्यांना ते मनापासून हवं असेल की नाही, हिचा कुणाला त्रास तर होणार नाही ना अशा शंकांमुळे एकीकडे हिला सगळ्यांच्यात मिसळू देणं म्हणजे पण अवघड आणि दुसरीकडे तिला कुणात मिसळू न देता सारखं घरात अडकवून ठेवणं पण अवघड. आमच्या बिल्डिंगमधल्या लहान मुलांच्या वाढदिवसांच्या पार्टीला सगळ्या लहान मुलांबरोबर आरती पण येते, तिलाही रिटर्न गिफ्ट हवं असतं, डान्स करायचा असतो. अशा वेळी पण काकूंना खूप त्रास होतो. ज्या लेकीचं, स्वतःच्या मुलांचे वाढदिवस करायचं वय आहे तिला असं लहान मूल म्हणून इतर लहानगयांच्या पार्टीला जाताना बघून आतडं पिळवटेल नाहीतर काय होईल? पण परत दुहेरी कसरत! तिला 'जाऊ नको' म्हणायची सोय नाही. काका आपले वाढदिवसाला देण्यासाठी गिफ्ट आणून देण्याचं काम करतात.
एकदा काकू खूप वेळ बोलत होत्या. 'पोरीची जात आहे गं, काळजी जास्तीच वाटते. एकीकडे कळत तर काही नाही हिला पण तरुण मुलींप्रमाणे नटा-थटायचं तर असतं, makeup करायचा असतो, टीव्ही मधे बघते ना काय काय तरी मग काहीबाही प्रश्र्न विचारत रहाते.. आता काय उत्तरं देणार हिला? चारचौघांसारखी असती तर आपोआप सगळी हौस पुरवली असती... बरं, बाकी काही कळत नसलं तरी हट्टीपणा बरोबर कळतो.. आता ह्यांचं वय काय कमी आहे का गं? पण रोज उभं राहिलंच पाहिजे... दाखवत नाहीत ते पण आतल्या आत किती सोसतील? माझी मेलीची तब्येत पण धड नसते, यांच्यावरच सगळा लोड येतो.. कळतंय सगळं पण काय करू?' काकूंच्या समोर बसणं सुद्धा अवघड होऊन गेलं.. यांच्यासमोर खरंच किती वेगवेगळे प्रश्र्न आहेत! आणि आमच्या पोरानं जरा आमचं ऐकलं नाही की आमचं बिनसतं..
दाते काकूंची तब्येत तर वरचेवर बिघडलेलीच असते पण चाळिशी उलटून गेलेल्या आरतीला पण हल्ली काही ना काही होतच असतं. BP च्या गोळ्या पण आहेत म्हणे. 'ज्येष्ठ नागरिकत्व' मिळून १० वर्षं उलटून गेलेल्या काकांना मात्र आजारी पडायला अजिबात स्कोप नाही! मागच्या वर्षी, पोटाच्या काही आजाराने, काकांना २-३ दिवस हॉस्पिटल मधे काढावे लागले होते. मायलेकी दोघी पुरत्या हबकल्या होत्या. आता काकांना आजारी पडायची पण भिती वाटते. पण तरीही काही न दाखवता एकदा हसून मला सांगत होते, 'अशा वेळी कधी कधी माझी लेक एक्दम शहाण्यासारखी वागते बघ. मला म्हणत होती, "बाबा, सगळं नीट होईल हां, तुम्ही काही काळजी करू नका. माझी काळजी तर मुळीच करू नका, मी नीट राहीन", आता हिला वेडी कशी म्हणू?' आणि पटकन तिथून निघूनही गेले.
जरा ऋतू बदलला की फक्त एक मजला उतरून, भिंतीपलीकडच्या शाळेतून ईशानला आणायला जाताना माझी कुरकुर होते आणि काका मात्र, या वयात, ऊन असो की पाऊस, चार मजले चढ-उतार करत, ईस्टहून वेस्टला (!) लेकीला 'special' मुलांच्या शाळेत सोडायला हसत हसत जातात! ज्या वयात, नातवंडाला स्कूल-बस पर्यंत पोहोचवायचा सुद्धा कंटाळा आला तर काही वावगं वाटू नये, त्या वयात आपल्या - कधीच मोठया न होऊ शकणाऱ्या - मुलीला शाळेला सोडायला विनातक्रार जातात! मूळचा ऊंच बांधा वयामुळे जरा झुकलेला, डोक्यावरची हिरवळ विरळ होऊ लागलेली, तोंडाचं जवळ जवळ बोळकं झालेलं अशी, वाढत्या वयामुळे येणारी, सर्व शारिरीक 'deterioration'ची चिन्हं दिसू लागली असली तरी मनाच्या ताकदीने त्यावर मात करत राहतात! ही एवढी ऊर्जा कुठून मिळत असेल त्यांना? मला वाटतं, काकांचा दिनक्रम ही त्यांची मोठी उपासनाच आहे! आणि एवढी उपासना करणाऱ्याला स्वतः परमेश्र्वरच शक्तीचा पुरवठा करत असेल खास!
काहीही असो, काका, तुम्हाला सलाम! सलाम!! सलाम!!!
Kharach ashya lokanmule aaplyala jaaneev hote, Aapla dukkha, he dukkha nastach.
ReplyDeleteAapan Kitti takraar karat asato Kaayam.
These people help us grow, but at the cost of what! :-(
Kharach!! Aapan khupach nashibwan! Hats off to all these people! And gratitude ������������
Deleteखरोखरच खूप खूप सलाम !! एवढेच बोलू शकते.
ReplyDeleteआपण म्हणतो अशी वेळ शत्रूवर पण आणू नये, ते या बाबतीत नक्कीच खरं आहे. हे वाचून झाल्यावर काही क्षण आवंढा दाटून आला होता. दातेकाकांसाठी /\
ReplyDeleteहृदयस्पर्शी
ReplyDeleteखरंच डोळे,कान उघडे असतील व मनाची कवाडे खुली असतील तर खूप काही शिकू शकतो आपण.आजूबाजूला अशीही माणसं असतात.फार सुंदर,मनाला भिडणारया भाषेत वर्णन!
ReplyDeleteदाते काकांना सलाम! लेख नेहमीप्रमाणे मस्तच! वाचताना डोळे भरुन आले.
ReplyDeleteApratim. Bharun aala vachtana!! Kharach salam_/\_
ReplyDeleteTouchy.... Seriously hats off to them for facing such a situations....
ReplyDeleteAggg😭😭😭
ReplyDelete