Wednesday, March 8, 2017

महिला दिन - 2...

आज ८ मार्च. जागतिक महिला दिन! आणि मी या जगातील एक सक्षम, स्वतंत्र, सुंदर (अजून काय बरं?... हो, असं मला काल परवापासून आलेल्या msgs नी सांगितलंय!) वगैरे काय कायशी महिला.. तो आज एक पोस्ट तो बनता हैं!! आधीच क्लिअर करते की ही पोस्ट, mainly तरी, साधारण मध्यमवर्गीय, सुशिक्षीत, फेसबुक, WA वरून व्यक्त होणाऱ्या (रिकामटेकड्या गप्पा ठोकणाऱ्या असं म्हणलं नाही हां मी openly) अशांनाच डोळ्यापुढे ठेवून लिहिलेली आहे. बाकी कष्टकरी वर्गातल्या, खऱ्या गरजू किंवा पीडित अशा महिलांकडे या असल्या पोस्ट्स बिस्ट्स वाचायला वेळ ही नाही आणि असली थेरं त्यांना परवडणारीही नाहीत.

तर, काल-परवापासूनच महिला दिनानिमित्त काही ना काही msgs यायला सुरुवात झाली आणि गेले साधारण ३६४ दिवस विस्मरणात गेलेलं माझं महत्व मला परत प्रकर्षाने जाणवायला लागलं.. नवऱ्याला म्हणलं पण मी काल की 'मूठभर मांस वाढल्यासारखं वाटतंय'; तर त्याने लगेच डोळे मोठे करून, 'अजून किती वाढणार?'चे looks दिले मला.. पण अरे हॅट!! मी एक स्वतंत्र महिला आहे आणि मी किती वाढायचं हे मी ठरवणार!! :P हो, किमान उद्याचा एक दिवस तरी मी माझी स्वतंत्र अस्मिता का काय ती जपणारच! एकंदरीत काय तर जरा 'हवेतच' होते मी काल झोपायला जाताना.. पण आज सकाळ झाली मात्र घरातल्या ५ वर्षांच्या 'पुरुषाने' मला परत जमिनीवर आणायचं काम केलं बरोबर!! 'आज किमान संध्याकाळची एक वेळ तरी मला स्वयंपाकघरातून सुट्टी मिळूदेत' असं सूतोवाच करायला मी सुरुवात केल्यावर लगेच साहेबांना 'आज काय आहे? का आहे?' वगैरे प्रश्र पडलेच आणि मग थोडक्यात सांगितल्यावर लगेच पुढचं वाक्य आलं, 'पण मग परवा बाबांनी पाणीपुरी केली होती तेव्हा आणि मागच्या आठवडयात पावभाजी केली होती तेव्हा पण महिला दिन होता का???'!!! आज बहुदा बाबाकडून लेकाला काहीतरी गिफ्ट मिळणार महिला दिनाचं!!! 

बाप-लेकानी मिळून माझ्या आयुष्यातल्या 'एवढया महत्वाच्या' दिवसाच्या प्लँनिंगला सुरुंग लावायचा प्रयत्न केला तरी आज बधायचं नाही असा पक्का निश्र्चयच केला मी शेवटी आज सकाळी! माझ्या अस्तित्वाला काही किंमत आहे की नाही? एक दिवस तरी मला पूर्ण attention मिळायला नको?

मगाशी लेक विचारत होता, 'आई, आज सगळं तुझ्या मनासारखं केलं की उद्यापासून तू सगळं माझं ऐकणार ना?'!! हो रे बाबा, उद्यापासून काय ठेवलंय आमचं? आजचा दिवस तेवढा आमचा - तो तरी आहे कि नाही देव जाणे! हे सगळं (अर्थात मनात) म्हणतीये मी तेवढयात नवरोजींचा फोन आलाच, 'आज घरी यायला ११.३०-१२ तरी वाजतील, तुम्ही जेवून घ्या!!' घ्या... लागली वात सुरुंगाला?  चला, आता गपगुमान स्वतः स्वतः स्वयंपाक करा आणि करा celebrate!!



    

5 comments: