८ मार्च. महिला दिन. 'ती'च्या दृष्टीने रोजच्याच सारखा अजून एक दिवस. महिला दिन म्हणून काही वेगळं celebration वगैरे करायची गरज तशी तिला कधीच वाटली नाही. त्यातून तर आज नवरा पण ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेल्यामुळे काही एक्सट्राची कामं पण तिलाच उरकायची होती. लेक शाळेतून येईपर्यंत जमतील तेवढी कामं हातावेगळी केली की तिला बरं पडायचं, कारण मग एकदा का लेक आली की तिच्यातच गुंतायला व्हायचं. आठवी मध्ये शिकणारी तिची एकुलती एक लाडकी लेक आता हळूहळू तिची मैत्रीण होऊ लागली होती. लेकीच्या आठवणीने तिच्या चेहेऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटलं.
तिची कामं होई होईस्तोवर ठराविक वेळी लेक आलीच. पण आज मूड जरा वेगळा वाटत होता. मनात काहीतरी विचार चाललेत हे स्पष्ट जाणवत होतं. मायलेकी जेवायला बसल्या आणि अचानक लेकीकडून, अगदी गंभीर आवाजात प्रश्र आला, 'आई, बाबा तुला फारसं महत्व देत नाहीत का गं?' पहिले तर आईला काही कळलंच नाही आणि मग थोडंसं हसूच आलं. पण लेकीचं मन राखण्यासाठी परत गंभीर होत तिने लेकीला बोलतं करायला सुरुवात केली.
लेक म्हणाली, 'आई, आज womens' day आहे ना? मग तू काहीच स्पेशल का केलं नाहीस? आणि याच वर्षी नव्हे तर आधी पण कधीच मी तुला काही celebrate करताना पाहिलं नाही. माझ्या मित्र-मैत्रिणींपैकी प्रत्येकजण काही ना काही स्पेशल plans सांगत होता आज. कुणाच्या बाबांनी आज नाश्ता बनवला तर कुणी आज हॉटेल मध्ये जाणार आहे. कुणाच्या आईला फुलं मिळाली तर कुणाला surprise गिफ्ट. तुझ्या बाबतीत मात्र यातलं काही तर सोडाच पण बाबा सरळ गावाला निघून गेले....' लेकीने आत साठवलेली सगळी वाफ बाहेर टाकली.
'ती'ने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. आपलं बाळ आता मोठं होत चाललंय आणि या भावी 'महिलेला' नातेसंबंधांविषयी चार गोष्टी सांगायची वेळ आता आलीये असं वाटून तिने हळुवारपणे बोलायला सुरुवात केली.
ती: सगळ्यात आधी मला सांग, की बाबांनी हा दिवस का साजरा करायला हवा होता?
लेक: हल्लीच्या 'स्त्री-पुरुष' समानतेच्या काळात तुला पण equal importance मिळायला हवा..
ती: Celebrate करून?
लेक: अगं पण आजचं महत्व....
ती: फक्त एक महिला म्हणून? एकीकडे तू स्त्री-पुरुष 'समानते'बद्दल बोलतीयेस आणि मग, दुसरं काहीच कारण नसताना, मी फक्त 'एक स्त्री आहे' म्हणून आज कौतुक करवून घेऊ? हां आता, स्वतःचे थोडे लाड करून घ्यायला काय कुणाला पण आवडेलच की आणि ते मी मला हवं तेव्हा करून घेतेच की! आणि हो, तुझ्या बाबांना पण आवडत असेलच ना गं स्वतःचे लाड करून घ्यायला? पण तुझं सोड, त्यांना स्वतःलाही १९ नोव्हेंबरला साधी आठवणही नसते. मग त्यांना importance नाही देत का मी?
लेकीला थोडं विचारात टाकून तिने विषय पुढे नेला.
ती: बर, आता मला सांग, 'स्त्री-पुरुष समानता' म्हणजे नक्की काय गं?
लेक आठवीत म्हणजे तशी लहानच होती अजून. त्यातल्या त्यात सुचलं ते बोलली.
लेक: म्हणजे दोघांच्यात कुणीही कमी आणि कुणी जास्ती असं नको, एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा असं नको, मुळात पुरुषांनी बायकांना 'तुम्ही असं वागलं पाहिजे आणि तसं नको' वगैरे सांगताच कामा नये.
ती: मला काय वाटतं सांगू? स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा, एकमेकांच्या मतांचा, भावनांचा आदर करणं सगळ्यात महत्वाचं! तसं झालं की आपोआपच दोघं एकमेकांचा विचार करूनच वागतील आणि कुणी कुणावर काही लादणार पण नाही. पुरुष किंवा स्त्री म्हणून एखादयाकडे न पाहता 'माणूस' म्हणून बघणं जास्ती महत्वाचं! एखादया नात्यात मुलाकडे काही स्ट्रॉंग पॉईंट्स असतील तर दुसऱ्या एखादया केस मध्ये मुलीकडे.. संपूर्ण परफेक्ट असं तर कुणीच नसतं. जिथे एक जण कमी पडेल तिथे दुसऱ्याने टेकू द्यायचा असतो. आणि हे फक्त स्त्रियांनाच लागू आहे असं नाही हां, तर प्रत्येक माणसाने प्रत्येकच नात्यात असा विचार करायला हवा असं मला तरी वाटतं. कारण शेवटी आपल्याला काय महत्वाचं आहे? मिळून मिसळून आनंदात जगणे की मी किती भारी याची टिमकी वाजवणं?
तसं पाहायला गेलं तर स्त्री-पुरुष समानता ही कन्सेप्ट सुद्धा कधी कधी खूप वरवरची वाटते मला. कारण काही मूलभूत शारिरीक आणि वैचारिक बदल जे त्या जगनिर्मात्यानेच निर्माण केले आहेत ते तर कुणीच अमान्य करू शकत नाही आणि त्यातून निर्माण होणारी limitations कुणी टाळू ही शकत नाही. इतर बाबतीत अगदी समसमान वगैरे म्हणायचं तर मला तरी वाटतं की कुठल्या दोन व्यक्ती अगदी एकदुसऱ्यासारख्या, समान असू शकतात? - मग अगदी दोन पुरुष जरी असले किंवा दोन बायका जरी असल्या तरी - आणि का असाव्यात? खुद्द परमेश्वराने जर प्रत्येकाची एक 'युनिक' अशी 'आयडेंटिटी' बनवलीये तर आपण का 'कुणासारखं' तरी व्हायचा प्रयत्न करायचा? एकमेकांशी तुलना करायचीच कशाला?
मुळात आपल्या संस्कृतीत 'प्रकृती' आणि 'पुरुष' या दोघांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ अशी तुलना नाहीचे; त्यांना एकमेकांसाठी पूरकच मानलं गेलंय. कुणा एकाशिवाय दुसऱ्याला पूर्णत्व असूच शकत नाही. आपल्या भगवान शिवशंकरांचं 'अर्धनारीनटेश्वर' रूप माहितीये ना? ते हेच सांगतं.
लेक: आई, तू एवढं एकमेकांविषयी आदर वगैरे म्हणतेस पण बाबांनी कुठे तुझ्या शिक्षणाचा आदर केला? नोकरी सोडून घरीच बसायला लावलं ना तुला?
ती: (थोडया कडकपणे) कुणी सांगितलं बाळा तुला असं? अगं, तू व्हायच्या आधी मी पण नोकरी करत होते आणि तू झाल्यावर नोकरी सोडायचा निर्णय सर्वस्वी माझा होता. आणि तुझ्या बाबांनी माझ्या इच्छेचा मान राखून मला ती सोडू दिली हा नक्कीच त्यांचा मोठेपणा होता कारण त्यावेळी आपल्या घरातली आर्थिक स्थिती फार काही खास नव्हती. पण माझ्या डोक्यात बालसंगोपनाबद्दलचे माझे असे काही खास विचार होते आणि म्हणून मला नोकरी सोडायचीच होती. पैशांची गरज असूनही त्यांनी माझ्यावर ती नोकरी लादली नाही सोन्या! मला माझ्या मनाप्रमाणे वागू दिल.
लेक: (नवंतरुण विचारांमुळे थोडीशी उसळून) आई, तू असं काय बोलतीयेस अगदी त्यांनी उपकार केल्यासारखं? तू नोकरी करावीस की नाही हा पूर्णपणे तुझाच निर्णय असणार ना.. त्यात काय एवढं?
ती: का? संसार काय माझा एकटीचा होता किंवा आहे - मी एकटीच्या विचाराने निर्णय घ्यायला? उद्या तुझ्या बाबांनी अचानक नोकरी सोडायची ठरवली आणि माझा विचारही घेतला नाही तर? आमचा संसार सुरु होताना आमच्या दोघांच्या पगाराला जमेस धरून सुरु झाला होता. त्यामुळे माझ्या नोकरी सोडण्याचा त्यांच्यावर खूप लोड येणार होता. तरी त्यांनी माझ्या इच्छेचा मान ठेवला हा त्यांचा मोठेपणा नाही? एकमेकांचा काडीचाही विचार न करता 'माझे निर्णय माझे, तुझे तुझे' असंच करायचं असेल तर मग कुटुंब म्हणून एकत्र तरी कशाला राहायचं? आजच्या पिढीचं बऱ्याच प्रमाणात हेच झालंय की ते 'माझं-माझं' म्हणत राहतात, 'आपलं' होऊच देत नाहीत.. आणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य, स्वतःची so called 'space' जपताना, दुसऱ्याला मात्र गृहीत धरतात.
लेक आता थोडी अंतर्मुख झाली होती.
ती: बाळा, तसं बघितलं तर आयुष्य खूप सोपं आणि सुंदर आहे गं! आपण उगीचच त्याला किचकट करून ठेवतो. आपल्या चांगल्या घडणीच्या दृष्टीने आपण ज्यात लक्ष घालायला पाहिजे, ज्यावर खरंच विचार करायला पाहिजे असे इतर खूप महत्वाचे विषय असतात जगात, पण आपण नको त्यातच वेळ आणि शक्ती वाया घालवतो. सतत कोर्टात उभं असल्यासारखं 'भांडण-mode' मध्ये असतो. खरं तर ना, प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली असते आणि प्रत्येक स्त्री मध्ये एक पुरुष! बघ ना, आपण आपल्या विठ्ठलाला किंवा संत ज्ञानेश्वरांना 'माऊली' म्हणतो आणि आपली देवी भयंकर असुरांचं मर्दन करायचं काम करते!! गरजेच्या वेळी बाहेर काढायसाठी, प्रत्येकाने आपल्या आतल्या त्या दुसऱ्या भागाचं अगदी नकळत जतन केलेलं असतं, करायचं असतं. मुलांनी मुलींना किंवा मुलींनी मुलांना कमी लेखणं म्हणजे स्वतःमधल्याच एका अविभाज्य घटकाला नावं ठेवण्यासारखं नाही का?
विचारात बुडलेल्या आपल्या चिमणीला तिने हलकेच जवळ घेतलं. लेकरू अजून लहान होतं.
ती: आणि आता अगदी शेवटची म्हणून तुला एक मजा सांगू? हे सगळं असलं तरी ना, तुझ्या बाबांनी आत्तापर्यंत दर womens' day ला मला गुलाबाचं एक सुंदर फूल दिलंय हां, अगदी न चुकता! आणि मी पण ती सगळी अजून जपून ठेवलीयेत!! चल तुला दाखवते...
लेकीच्या गालावर फुललेले गुलाब तिचा 'महिला दिन' खास करून गेले!!!