Thursday, January 25, 2018

सखी

'कथापूर्तीच्या' उपक्रमात same पूर्वार्धाचा लिहिलेला हा अजून एक उत्तरार्ध..

पूर्वार्ध:-

मयंक आणि चेतन खूप वेळ किनाऱ्यावर बसून होते. गेले कितीतरी तास दोघांचे वाद चालू होत आणि आता अगदी भयाण शांतता होतीे. त्या वादाचा आणि आताच्या शांततेचा साक्षीदार असलेला सूर्य आता डुबायला आला होता.

खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांना हळूहळू लक्षात आलं होतं की आपण दोघेही पायलवर प्रेम करतोय. पण त्या तिघांच्या पक्क्या मैत्रीमुळे दोघेही गप्प होते. एकमेकांना आजमावत होते. पायलचा अंदाज दोघांनाही येत नव्हता. कॉलेज संपून आता तिघेही आपापल्या कामाला लागले होते. तिघेही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जम बसवू लागले होते. तिघांचीही आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्तर सारखाच होता.

कॉलेजमध्ये खूप धमाल तिघांनीही केली होती. एकत्र सहलीला गेले होते, सिनेमे, नाटके पाहिली होती,  प्रत्येक गोष्ट एकत्र केली होती. अगदी व्हाट्सअप्प गृप व्यतिरिक्त पर्सनल मेसेज सुद्धा केले नव्हते कधीच. एवढी तिघांमध्ये unity होती.

पण आज अचानक जेव्हा पायलच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा दोघांनाही, खरंतर तिघांनाही ती कल्पनाच सहन झाली नाही.

पायलला देखील कळत होते की दोघेही तिच्यावर प्रेम करतायत जीवापाड. तिलाही दोघे अगदी चांगले मित्र म्हणून आवडत होते. पण तिला कळत नव्हते की आपल्याला नेमकं दोघांपैकी कोण आवडतं ? दोघेही तिच्या जीवनात एकाच वेळेस आले होते. दोघेही तितकेच तडफदार, हुशार, स्मार्ट. एखाद्याला पाहून त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होणे या स्टेजच्याही आधीच तिला तिच्या मैत्रिणीकडून कळलं होतं की ते दोघेही तिच्यावर प्रेम करतायत जीवापाड. शलाकाला जे कळलं ते पायलला स्वतःहून कळलंच नव्हतं इतकी ती त्यांच्या मैत्रीत गुंगून गेली होती.

आपल्याला कोणाचे आकर्षण वाटते या विचारापाशी येऊन ती थबकायची. तिला आता मैत्री आणि प्रेम यातील फरकच कळेनासा झाला होता. विचार करून करून डोकं शिणून गेलं होतं. तिघांचे गृप फोटो सतत पाहून पाहून वेड लागायची पाळी आली होती तिच्यावर.  

रात्रीचे 8 वाजले तरी nearby app मध्ये दोघांची लोकेशन्स जुहू बीच दिसत होती.

ती तडक उठली, कपडे बदलले, तिची scooty काढली आणि निघाली.

मयंक आणि चेतन दोघांनाही नोटिफिकेशन आले "payal pradhan is nearby ..."

उत्तरार्ध:-

गाडी चालवता चालवता पण पायल त्याच विचारात होती. त्या दोघांपाशी पोहोचायच्या आधी कुठल्या ना कुठल्या निष्कर्षापर्यंत यायलाच हवं होतं तिला.. पुनःपुन्हा तिच्या डोळ्यांपुढे तिचे दोन्ही लाडके मित्र येत होते. चेतन एकदम संयत, थोडासा अबोल कडे झुकणारा, कुठल्याही गोष्टीचा अगदी सर्व बाजूंनी विचार करणारा तर मयंक एकदम उत्कट, 'on an impulse' म्हणतात तसं काहीसं जगणारा - पण तरीही थिल्लर नक्कीच नाही.. सगळ्यात मुख्य म्हणजे दोघंही तिला जीवापाड जपणारे!! 'असे मित्र मिळायला खरंच भाग्य लागतं,' तिच्या मनाने तिला पुन्हा एकदा सांगितलं; 'आणि म्हणून तर त्यातल्या कुणाही एकाला दुखावणं आणि दुसऱ्याला निवडणं हे खूपच अवघड आहे,' तिनेही मनाला ठणकावून सांगितलं..

विचार संपत नसले की नेमका रस्ता मात्र चटकन संपतो. पायलला बरोब्बर माहिती होतं हे दोघं कुठे बसलेले असणार ते - त्यांच्यातलं bondingच होतं मुळी तसं! 'काय guys, आज मला सोडून दोघंच इथे येऊन बसलात ना? कंटाळा आला की काय माझा?' त्यांच्या समोर बसकण मारत पायल ने प्रश्न केला तसं मयंक चटकन म्हणाला, 'तूच तर आता आम्हाला सोडून जायच्या तयारीत आहेस.' टचकन पाणीच आलं पायलच्या डोळ्यात अन सगळंच वातावरण जरा गंभीर झालं.

'मयंक, बरं झालं एक प्रकारे, तू direct विषयालाच हात घातलास ते, मी आज तुमच्याशी त्याच विषयावर बोलायला आलीये. माझ्यापुढे सध्या एक भयंकर पेचप्रसंग निर्माण झालेला आहे आणि माझे सगळ्यात जवळचे मित्र म्हणून तुम्हीच आता मला मदत करायला हवीये. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात जवळच्या दोन व्यक्तींपैकी एकाची मला माझा 'life partner' म्हणून निवड करायचीये आणि कुणाला दुखवायचं ही नाहीये. मला खरंच काही कळत नाहीये. म्हणून मी...'

पायलचं वाक्य पुरं व्हायच्या आतच चेतन म्हणाला, 'कुणाला दुःख वाटेल की काय ते जाऊदे, पण पायल, तुझं नक्की प्रेम कुणावर आहे ते जास्ती महत्वाचं आहे ना? उगीच एकाला दुःख होऊ नये म्हणून तू दुसऱ्यावर अन स्वतःवर पण अन्याय करणार का?'

'अरे डंबो, तेच तर सांगतीये की मला तसं काहीच नक्की कळत नाहीये. मला खरंच तुम्ही दोघंही खूप आवडता रे!' पायल कळवळून म्हणाली.

'पण म्हणजे मग,' एक मिनिटभर विचार करून चेतन म्हणाला, 'तू आमच्यापैकी कुणाच्याच प्रेमात अशी नाहीयेस, तुला आतून असं काही खास असं कुणाच बद्दल वाटत नाहीये; कारण तसं असतं तर तुला "कुणाला निवडावं" हा विचार करत बसावंच लागलं नसतं.. तो निर्णय आतून, आपसूकच आला असता.. मग तू तुझ्या आयुष्याच्या एवढया मोठया निर्णयाच्या बाबतीत पर्याय आमच्या पुरतेच मर्यादित का ठेवतीयेस? तू आमच्या पैकी कुणाच्या प्रेमातच पडली असतीस तर गोष्ट वेगळी होती. पण तू जर, अजून तरी, तशी गुंतली नसशील तर इतरही पर्यायांचा विचार कर की...'

'म्हणजे?' पायल थोडी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. मयंकला पण चेतनच्या वागण्याचा काही उलगडाच होईना.. या मुलाला जिच्याबददल प्रेम भाव आहेत तिलाच तो ईतरांशी लग्नाचा विचार करायला सांगतोय? 'डोक्यावर पडलाय की काय हा?' असंही वाटून गेलं त्याला.

पण चेतन आता पूर्ण शांत झालेला दिसत होता आणि अगदी नीट विचार करूनच बोलत होता. 'मॅडम, गेल्या कित्येक वर्षांत, तुम्ही, आम्ही दोघं सोडून, इतर फार कुणाशी संपर्कच ठेवला नाहीये - किमान इतक्या जवळून तरी नक्कीच नाही! त्यामुळे आज तुला आमच्या शिवाय कुणी पर्यायच नसल्यासारखं वाटायला लागलंय. पण कुणी सांगावं, मित्र म्हणून आम्ही कितीही चांगले असलो तरी जीवनसाथी म्हणून कदाचित अगदीच 'डंबो' असू. आणि मग उगीच अपेक्षाभंग व्हायचा.. त्यापेक्षा, तू लग्नासाठी म्हणून विचार करताना फक्त मैत्री एवढा एकच मुद्दा न बघता, तुझ्या भावी नवऱ्याच्या घरची माणसं, त्याची आर्थिक स्थिती, त्याचा स्वभाव, त्याच्या त्याच्या बायको कडून असणाऱ्या अपेक्षा वगैरे सगळ्या गरजेच्या मुद्द्यांचा विचार करून मग नीट काय ते ठरव.'

'अरे पण मग असा सगळा विचार तिला आपल्या दोघांपैकीच कुणाबद्दल करायचा असेल तर?' मयंक जरा अधीरतेने म्हणाला.

'हो ना.. कारण, नाहीतरी कुणाला तरी निवडायचंच आहे तर तुमच्याकडे माझ्याशी जुळणाऱ्या tuning चा plus point तरी आहे..' पायल पुटपुटली.

'पूर्ण सारासार विचार करता तिला आपल्यापैकी कुणी तसा योग्य वाटत असेल तर चांगलंच आहे की!!' चेतन म्हणाला. 'मी promise करतो की, असा सगळ्या angles नी विचार करून, पायलने जर मयंकची निवड केली तर मी पूर्ण आनंदाने आणि मनापासून ते स्वीकारीन आणि मग आयुष्यभर पायल माझी एक चांगली 'सखी' बनून राहील. I promise! आणि मला वाटतं मयंक ही असाच विचार करत असेल. फक्त, आपल्याला कसं दुखवायचं म्हणून किंवा गेल्या कित्येक वर्षांच्या सवयीचा भाग म्हणून पायलने आपला विचार करू नये एवढंच महत्वाचं...'

मयंकने एकदम भारावून चेतनला मिठीच मारली. पायलला पण आता खूप शांत वाटत होतं - कसलं तरी मळभ आलं होतं ते जाऊन आकाश एकदम स्वच्छ झाल्यासारखं!!

No comments:

Post a Comment