Sunday, May 14, 2017

Mother's Day!!

आज Mother's Day!! काही जण त्याला 'मातृदिन' पण म्हणतात; 'पण मुळात हा आपल्याकडचा दिवसच नाही त्यामुळे त्याला Mother's Day च म्हटलं पाहिजे' असंही काही जण म्हणतात. आपल्याला काय? दोन्हीही पटतं!! 😛

हे असे days वगैरे आले ना की हा असाच प्रॉब्लेम होतो बघा माझा! असे दिवस साजरे करण्याच्या बाजूने आणि विरोधात, दोन्ही प्रकारे हिरिरीने बोलणारे लोक असतात आणि अस्मादिकांना यांचं ऐकलं की यांचं बरोबर वाटतं आणि त्यांचं ऐकलं की त्यांचं... 'आईवरचं प्रेम व्यक्त करायला असा एखादा दिवस कशाला पाहिजे? आम्ही आमच्या आई-वडिलांवर रोजच प्रेम करतो, त्यांचा आदर करतो, असं एखाद दिवस वरवरचं काहीतरी करायचं आणि इतर वेळेला आई-वडिलांच्या मनाचा फारसा विचार पण नाही याचा काय उपयोग?' असं "विरोधक" म्हणाले की मला अगदी मनापासून पटतं.. पण तेवढ्यात "भक्त" कॅटेगरी मधलं कुणीतरी म्हणतं, 'जरी प्रेम रोजचंच असलं तरी प्रतिक म्हणून एखादा दिवस साजरा करायला काय हरकत आहे? तसं तर आपण रोजच वाढतो पण एक दिवशी वाढदिवस करतोच ना? त्या निमित्ताने आयुष्यात चार उत्साहाचे क्षण आले तर काय बिघडलं?' आता हे पण काय चूक आहे का सांगा बघू.. 😛

आपले पु. ल. होते ना, त्यांचा पण असाच प्रॉब्लेम होता म्हणे! म्हणजे, एखाद्या नेत्याची सभा ऐकली की त्याने अगदी भारावून जायला होतंय तोवरच त्याच्या अगदी विरोधी नेत्याची सभा ऐकली तर त्याचं पण बरोबर वाटायचं.. आपल्या व. पु. काळेंनी पण म्हटलं होतं की 'आपण सारे अर्जुन' - म्हणजे बरेचदा confused! आता आहे मोठमोठया लेखकांच्या अन माझ्या विचारात साम्य तर काय, आहे!! 😜

अरे, विषय भरकटला की काय? असो, पु. ल. आणि व.पु. राहूदेत जरा बाजूला तूर्तास.. तर Mother's Day करावा की नाही यावरचं माझं नक्की मत काही अजून ठरलेलं नाही (😛); पण मी काय म्हणते, त्याचं फार स्तोम न माजवता जरा त्या निमित्ताने आईबद्दल चार चांगले शब्द बोलले तर तेवढ्याने काय विरोधक चिडायचे नाहीत माझ्यावर.. तसंही आज पूर्ण दिवसात मी आईसाठी काsही special वगैरे केलं नाहीये आणि मी ज्याची आई आहे त्याच्या तर हे काही खिजगणतीत ही नाही! पण मग आईवरच्या प्रेमाचा उल्लेख, स्मरण करायला काय हरकत आहे?

तर... आजच्या या दिवसाच्या निमित्ताने, जिने मला जन्म दिला, माझं उत्तम पालन-पोषण केलं, जेवढे जमतील तेवढे जास्तीत जास्त चांगले संस्कार माझ्यावर करायचा प्रयत्न केला, माझ्या अक्षरशः असंख्य चुका पोटात घालून परत वर माझ्यावर खूप खूप आणि खूप प्रेमच केलं, जिच्या बाबतीत 'उपकार' हा शब्द खूप रुक्ष / rude वाटतो पण खरंच जिचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, माझं अस्तित्वच मुळात जिच्यामुळे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिच्याशी मी काहीही 'share' करू शकते त्या माझ्या 'लाडक्या मातामाऊलीला' माझा प्रणाम आणि खूप खूप प्रेम!!

जिथे मी जन्म घेतला, आई बरोबरच जिचा 'जननी जन्मभूमिश्र्च' असा महिमा वर्णन केला जातो, जिचे माझ्यावर कळत नकळत अनेक उपकार आहेत ज्यांची मी खरं तर काहीच परतफेड करत नाही अशा माझ्या 'मातृभूला - भारतमातेला' प्रणाम!!

या संपूर्ण जगाला कायमच 'अनंत हस्ते' नुसतं देत रहाणाऱ्या, बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता, अविरत स्वतःचं दानसत्र चालूच ठेवणाऱ्या, जीच्याशिवाय आपलं पान हलूच शकत नाही अशा 'सृष्टीमातेला' माझा विनम्र प्रणाम!!

या संपूर्ण विश्वाची सूत्रं हलवणाऱ्या, सर्वांवर कृपेचा वर्षाव करणाऱ्या, जीच्याकडे जाणे हे आपलं अंतिम ध्येय आहे अशा 'जगतजननी' 'जगन्मातेला' माझा साष्टांग प्रणाम!!

आणि या सगळ्याचं भान देणाऱ्या, जगन्मातेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणाऱ्या आणि त्या ध्येयप्राप्तीत मदत करणाऱ्या, माझ्या असंख्य चुका होत असूनही मला परत परत संधी देणाऱ्या, माझी खरंच काहीही लायकी नसूनही परत परत मला जवळ घेणाऱ्या, माझ्या पाठीशी उभं रहाणाऱ्या माझ्या प्रेमळ, दयासिंधु 'गुरुमाऊली'च्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम!!!

Saturday, May 13, 2017

माणुसकी गमावलेला माणूस...

कालच्या पेपर मधे एक बातमी वाचली. 'नाशिक जवळ कुठेसा एक अपघात झाला तेव्हा रस्त्यावर जमलेल्या लोकांनी जखमींना मदत करण्याऐवजी अपघातग्रस्त गाडीतले काही लाखांचे आंबे पळवले. जखमी विव्हळत पडले असताना, त्यांना उपचारासाठी न्यायच्या ऐवजी, आपल्या घरी जास्तीत जास्त आंबे कसे नेता येतील यासाठी सर्व जमलेल्यांमधे चढाओढ लागली होती.' वाचून काही क्षण तर मन सुन्न झालं, बधिर झालं. कुठे चाललोय आपण? माणूस म्हणजे 'माणुसकी' नसणारा प्राणी अशी व्याखा हल्ली बनत चाललीये की काय? काल ती बातमी वाचल्यापासून चीड, खंत, हतबलता, अस्वस्थता अशा विविध भावनांनी मनात ठाण मांडलंय.

खरंच, माणूस इतका स्वार्थी झालाय का? समोर एखादा माणूस जखमी होऊन, वेदनेने तळमळत पडलेला असताना त्याचं काहीही वाटू नये इतक्या प्रमाणात संवेदना मेल्यात का माणसाच्या? आंबे चोरले ही तर वाईटच गोष्ट आहे आणि त्याचं समर्थन होऊच शकत नाही; पण मी म्हणते, चोरायचेच होते तर आधी किमान त्या जखमींना मदत तरी करायची.. पण असं कसं करणार? त्यांना मदत करून येईस्तोवर इकडे आंबे संपले तर? त्यापेक्षा, ते गोळा करेपर्यंत एखाद्या जखमीचा जीव गेला तर त्यात काय एवढं?

स्वतःला हलकीशी सुई जरी टोचली तरी कळवळणाऱ्या माणसाला दुसऱ्या माणसाच्या वेदनांची जराही जाणीव असू नये? मग माणसात अन पशुमधे काय फरक? अर्थात हे म्हणणं ही काही बरोबर नाही कारण निसर्गाकडे नीट लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येईल की प्राणी पक्षी सुद्धा आपल्यातल्या इतरांना काही झालं तर अगदी अस्वस्थ होतात आणि जमेल तशी अन तेवढी मदत करायचा प्रामाणिक प्रयत्न तरी करतात.. अर्थात, आपण फक्त असे काही videos मिळाले तर ते फॉरवर्ड करणार!!

'दुसऱ्या माणसातही माझ्याप्रमाणेच परमेश्वराचा अंश आहे त्यामुळे त्याच्या वेदनेच्या जाणिवेने माझं मनही दुखावलं पाहिजे' वगैरे उदात्त विचार राहूदेत एक वेळ पण किमान 'उद्या माझ्यावरही ही वेळ आली आणि कुणीच मला मदत करायला आलं नाही तर?' एवढ्या स्वार्थी विचाराने तरी माणसाने दुसऱ्याच्या गरजेच्या वेळेस पुढे व्हायला काय हरकत आहे? अशा वेळी मात्र स्वार्थ बाजूला!

माणूस म्हणजे काय याच्या अनेक व्याखा आहेत त्यापैकी एक अशी ही आहे की 'ज्याला आपल्यासारख्याच इतरांच्या संवेदना जाणवतात तो माणूस!' या व्याख्येनुसार पाहिलं तर आजकाल 'पृथ्वीवर माणूस विरळाच' असंच म्हणावं लागेल बहुदा!! खूप पूर्वीपासून आपल्याकडच्या संत महात्म्यांनी सांगितलंय की 'दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यासाठी, त्याचे दोष पाहण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात कधीच नाक खुपसू नये पण दुसऱ्याच्या गरजेला मात्र कायम पुढे असावं.' संतांनी स्वतः तसं आचरून पण दाखवलंय. पण आज आपलं बरोबर उलटं झालंय - इतरांचे दोष बघायला अगदी पुढे आणि मदतीला मात्र मागे! प्रचंड आत्मकेंद्रीत झालोय बहुदा सगळे..

याचा अर्थ या जगात माणुसकी उरलीच नाहीये किंवा प्रत्येक जण टोकाचा स्वार्थी झालाय असंच पण नाही म्हणता येणार. कित्येकदा, अपेक्षा ही नसताना, आपल्याला माणुसकीचं दर्शन घडवणारे काही अतिशय चांगले अनुभव येतात! चांगले लोक आहेत म्हणून तर जग टिकून आहे. फक्त त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. इतरांचं काय असेल ते असो, पण मी स्वतः तरी त्या कमी लोकांपैकी एक असेन हे बघणं हे माझं कर्तव्य आहे... 

Friday, May 12, 2017

काव्यमय समस्यापूर्ती - ४

समस्यापूर्तीसाठीची ओळ -
"तो प्रवास सुंदर होता"...

त्यावरची माझी कविता -

बालपणीचे दिवस सुखाचे,
परी वेध तेव्हा मोठेपणाचे..
सरता पण ते रम्य बालपण,
वाटे, बरे होतो लहानच आपण..
असता शाळेत, कॉलेज ची धुंद ओढ,
कॉलेजात म्हणे शाळेचेच दिस गोड!
नोकरी करता वाटे माझा बिझनेस हवा,
बिझनेस मधे वाटे, नोकरीच होती बरी बुवा!
तारुण्यात वाटे कधी एकदा 'दोनाचे चार' होतो,
नंतर वाटे प्रत्येकालाच 'एकटा मी काय वाईट होतो?'
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खुणावतो भूत वा भविष्यकाळ,
हातचे सोडून पळताना पण नकळत निसटतो वर्तमानकाळ..
आनंदी जीवनासाठी हे समजून घेणे गरजेचे,
आयुष्य असते कायमच मिश्रण पूर्ण अपूर्णाचे..
समंजस असे हे जीवनभान जागता,
स्वीकारी मन वळणातील अपूर्णता,
मग अपूर्णच जरी, तरी खरे पाहता,
वाटे प्रत्येकच तो प्रवास सुंदर होता!!

Sunday, May 7, 2017

वळीव

प्रचंड उकाडा.. जीवाची नुसती तगमग होतीये.. हवा अशी नाहीच .. वातावरण एकदम कुंद झालेलं.. गच्च गच्च तर इतकं की कधी एकदा पाऊस कोसळतोय असं झालंय पण पावसाच्या धारांच्या ऐवजी घामाच्याच धारा वाहतायेत.. त्यातून लाईट पण गेलेले त्यामुळे पंख्याशिवाय 'जीव जायसे सत्वर करा' अशी अवस्था.. त्यातल्या त्यात, जीव रमवण्यासाठी रेडिओ लावलेला.. तेवढ्यात बाहेर वातावरणात अचानक काही बदल होऊ लागतात, गडगडाट ऐकू येतो, वारा सुटतो - खरं तर वावटळच, मधेच लखकन वीज चमकून जाते.. रेडिओवर आशाताई मखमली आवाजात गात असतात - "जशी अचानक या धरणीवर, गर्जत यावी वळवाची सर".. आणि नेमका त्याचवेळी बाहेर, धरणीला आणि धरणीपुत्रांना तृप्त करायला, वळीव बरसू लागतो!! आहाहा!! किती सुंदर योग!! 

भर उन्हाळ्यात मधेच पडून जाणारा वळीव खरंच खूपच हवाहवासा असतो.. मुंबईकरांच्या भाग्यात हे सुख नाही. पण उन्हाळी सुट्ट्यांसाठी माहेरी असल्यामुळे मला हे सुख अनुभवता येतं! प्रचंड उष्म्याशी लढत असताना मधेच आलेला हा 'देवदूत' गात्र अन गात्र सुखावून टाकतो आणि पुढे किमान महिनाभर तरी चालणाऱ्या उन्हाळ्याशी दोन हात करायला मनाला एक ताकद देऊन जातो! पावसाळ्यासारखा तो सलग चालू राहात नसला तरी भर उन्हाळ्यात मिळालेली त्याची 'short n sweet' झलक उन्हाळा एंजॉय करायला हातभार लावते..
बरेचदा तर हा वळीव येताना बरोबर गाराही घेऊन येतो.. कधी ताडताड लागणाऱ्या तर कधी सुईसारख्या बोचणाऱ्या या गारा वेचणे ही पण एक पर्वणीच!! आणि अशा वातावरणात ice-cream खायची मजा काही औरच!! 

अर्थात, या वळवाच्या पावसाचा कधी कधी अगदी 'फुसका बार' पण निघतो हां.. म्हणजे, आधी हवा अतिशय गच्च होते, मग वारा पण सुटतो पण नंतर नुसतीच वावटळ उडवून वळीव कुठेतरी गायबच होतो किंवा अगदीच किरकोळ असे चार शिंतोडे पडतात आणि मग उलट जास्तीच उकडायला लागतं.. आणि जरा वारा सुटला की लाईट्स मात्र हमखास जाणार!! मग बसा भट्टीत उकडून घेत.. आणि असल्या अर्धवट सरींनी कसलेसे किडे बिडे येतात ते वेगळंच! पण मग तुमच्या सहनशक्तीची पूर्ण कसोटी पाहिल्यावर मात्र तो तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतोच!! 

आपल्या आयुष्यात पण असे 'वळीव अनुभवण्याचे' कितीतरी क्षण येतात, नाही? कधीतरी मन खूप त्रासून जातं, जीवाची घालमेल होते आणि मग, अचानक, मन सुखावून जाणारी एखादी छोटीशीच घटना घडते जी त्यावेळच्या त्रस्त मनावर फुंकर तर घालतेच शिवाय परत नव्याने आयुष्याला सामोरं जाण्यासाठी मनाला उभारीही देते! असे छोटे छोटे वळीव मिळून आपलं आयुष्य किती सुखाचं बनवतात! अर्थात कधी कधी, काही फुसके बार ही निघतात पण ते ही आपली कसोटी बघून आपल्याला 'टफ' करण्यासाठीच असावेत.. आपण थोड्या सहनशक्तीनिशी त्या कसोटीत पास झालो तर परमेश्वरी कृपेचा वर्षाव झाल्याशिवाय खचितच राहणार नाही! 




Tuesday, May 2, 2017

काव्यमय समस्यापूर्ती - ३

समस्यापूर्तीसाठीची ओळ -
"तसा न राहिला आता उदास एकटेपणा"...

त्यावर मी लिहिलेली कविता -

आठवणी ठेवून मागे, सहचर गेला दूर प्रवासा
गर्दीतही एकटेपणाने जीव झाला वेडापिसा

"साथ सुटते कधी अचानक, भकास वाटते रिते जीवन
कुरवाळून ठेवली व्यथा जर, ग्रासून टाकी एकटेपण..
आयुष्याचे वास्तव हे खरे, 'मी' येतो एकटा जातो एकटा
गुंतून पडता सहप्रवाशांत, वेदनेचा रुततो काटा"...

जाणिव होता या सत्याची, शांत झाले क्लांत हे मन
दिसू लागले नजरेला या गरजू अन किती एकटे जन
आठवणींनीच दिली हिंमत, झटकण्या दुबळेपणा
दूर करण्या इतरांची एकाकी, कामी आला एकटेपणा
मन होते हळवे अजूनही, पण त्यात आता न उरला रडेपणा
अजूनही गर्दीत जीव एकटाच, पण तसा न राहिला आता 'उदास' एकटेपणा...

काव्यमय समस्यापूर्ती - २

समस्यापूर्तीसाठीची ओळ -
"बेफाम पसरिते पंख ह्रदय पाखरू"...

त्यावर मला सुचलेल्या ओळी -

ओढ अनामिक 'त्या' माउलीची
गुरुमाय प्रेमळ, मी अजाण लेकरु
पुण्य नसूनही, घेईल मज कवेत
बेफाम पसरिते पंख ह्रदय पाखरु...

मिटूनी जावे द्वैत नकळत
एकची व्हावे शिष्य अन गुरु
तरीही रहावे 'दास' सदोदित
बेफाम पसरिते पंख ह्रदय पाखरु...

ब्रह्मानंद हाचि खरा!!
वर्णन काय नि कसे करू?
उतरेल कधी ही आस सत्यात?
बेफाम पसरिते पंख ह्रदय पाखरु...

काव्यमय समस्यापूर्ती - १

सध्या, फेसबुक वरच्या आमच्या एका समुहावर 'काव्यमय समस्यापूर्ती' असा एक उपक्रम सुरु आहे. पूर्वी, राजे-महाराजे आपल्या पदरी असलेल्या कवींच्या बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी हा प्रकार करत असत. कवींना एखादी ओळ देऊन, त्यावरून साधारण चार ओळींची तरी काहीतरी रचना करायला सांगितली जात असे. त्याच धर्तीवरचा आमचा हा प्रयोग! त्या उपक्रमा अंतर्गत मी केलेल्या कविता (खरं तर कवितांचा प्रयत्न) इथे पोस्ट करत आहे.

समस्यापूर्तीसाठीची पहिली ओळ होती -
"मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा?"

त्यावरुन मला सुचलेल्या ओळी -

दिवस संपता संधिकाल, येते तद्नंतर निशा..
टिकत नाही ती ही कायम, पुन्हा दिवस, नव्या आशा..
अविरत चक्र चालूच राही, 'सातत्य' नियम निसर्गाचा...
मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा?

थांबवू शकला का कुणी खेळ उदय-अस्ताचा?
थांबवू शकला का कुणी प्रवास त्या 'मित्राचा'?
हारू नको, चल ऊठ, वाहुदे प्रवाह जीवनगंगेचा,
मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा?