काल १४ फेब्रुवारी - valentine day! बरेच लोक बर्याच दिवसांपासून ज्याची वाट पहात होते तो दिवस काल एकदाचा आला (आणि गेलाही)!! सोशल मेडियामुळे अजून काही दिवस या ना त्या मार्गाने स्मृती रेंगाळत राहतील या दिवसाच्या अन् मग दुसरा काही hot topic पुढे आला की हळूहळू हा विषय मागे पडेल - पुढच्या वर्षीच्या valentine day पर्यंत..
मला आठवतंय, मी साधारण आठवी - नववीत असताना पहिल्यांदा valentine day बद्दल ऐकलं. तेव्हा काही त्याची फार craze वगैरे वाटली नाही तरी उगीचच एक अगदी हलकीशी उत्सुकता निर्माण झालीच. तेव्हा आमच्याकडे TOI की Indian Express असा कुठलासा इंग्रजी पेपर यायचा आणि त्यात एक अख्खी मोठी पुरवणी यायची या valentine day च्या निमित्ताने. त्या पुरवणीमधे मोठमोठे रकाने भरभरून 'from me to you' अशा प्रकारचे मेसेजेस असायचे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसर्या व्यक्तीबद्दलच्या आपल्या प्रेम भावना या माध्यमातून व्यक्त करायच्या - कुणी एखादा शेर, कुणी कवितेच्या ओळी, कुणी एखादं फिल्मी गाणं तर कुणी नुसतंच 'I love you'! जाम मजा यायची मला ते वाचताना!! :D 'हा संदेश ज्या व्यक्तीसाठी आहे तिच्यापर्यंत तो खरंच पोहोचत असेल का? मग तिला काय वाटत असेल?' वगैरे गोष्टींवरून काहीतरी चर्चा सुरू होऊन मग आम्हा मित्रमैत्रिणींच्या टोळक्यात चिक्कार हसाहसी व्हायची. एकंदरीत पाहता, नव्यानेच माहित झालेलं हे प्रकरण थोड्याफार उत्सुकतेचं आणि जास्त करून थट्टेचंच होतं.
काॅलेज मधे गेल्यावर मग जरा सगळे संदर्भ बदलायला लागले! आजुबाजूच्यांचं पाहिलं की काही गोष्टी आपल्याही आयुष्यात याव्यात असं मधूनच वाटायला लागलं. ग्रुपमधे कुणाच्या 'जोड्या जुळवा' ला यश मिळालं की उगीचच पोटात गुदगुल्या वगैरे होऊ लागल्या. अशांची valentine day celebrations पाहिली / ऐकली की आपलाही कुणीतरी 'valentine' असावा (म्हणजे नक्की काय आणि कसा याच्या कल्पना मुळीच स्पष्ट नव्हत्या!) असं वाटायचं. मग त्या धुंदीत उगीच आपलं काही कविता बिवीता पण केल्या! : P एकुण काय तर सगळा स्वप्नील मामला!! :D
पण त्या काळची दुसरी एक गंमत मला आठवतीये ती म्हणजे आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच एकमेकींना चाॅकलेटस् द्यायचो. घरी आई-बाबा, दादाला तर द्यायचेच मी पण माझ्या मांजरांना पण valentine day निमित्त special treat मिळायची! 'प्रेम म्हणजे काय फक्त 'तसलंच' असावं का? आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे असं कुणीही आपलं valentine असू शकतं' वगैरे dialogues ही असायचे जोडीला!
नंतर हळूहळू जसं वय वाढत गेलं तशा प्रेमाच्या व्याख्याही बदलल्या आणि त्याच्या celebrationच्या कल्पनाही. वरवरच्या सादरीकरणापेक्षा नात्यांमधली खोली (depth), घट्ट वीण जास्ती महत्वाची वाटायला लागली. अन् मग valentine day साजरा करायची गरज आणि इच्छाही आपोआप कमी व्हायला लागली. हल्ली तर मला हा दिवस आलाय हेही लक्षात रहात नाही बरेचदा... पण तरीही नवर्याने अचानक एखादी, भले अगदी छोटीशीच, कॅडबरी आणून surprise दिलं तर आपल्याला तरी ते आवडतं बुवा!!
मला वाटतं, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने थोडा change हवा असतो सगळ्यांनाच; जरा मौजमस्ती करायला मिळाली की बरं वाटतं. पण या सगळ्याहून महत्वाचं म्हणजे दुसर्याकडून स्वतःचं कोडकौतुक करून घ्यायला आवडतं प्रत्येकालाच! कुणीतरी लक्षात ठेवून आपल्यासाठी काही करतंय हे सुखावणारं असतं. हल्लीच्या काळात तर आपल्या या सुखसोहळ्याचं इतर लोकांकडूनही कौतुक करून घ्यायला पण फारच आवडू लागलंय लोकांना.. फेसबूकवर प्रचंड प्रमाणात upload झालेले 'प्रेमळ' फोटोज हे याचं अगदी बोलकं उदाहरण आहे! हे फोटोज आपल्या valentine वरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आहेत असं प्रत्येकाला कितीही वाटत असलं (आणि ते अजिबातच नाही असं मी म्हणतही नाही) तरी त्यामागे कुठे ना कुठे आपल्या friend circle कडून भरपूर likes मिळवण्याचा म्हणजेच स्वतःचं कौतुक करून घेण्याचाच उद्देश असतो. तसं नसतं तर माणसांनी आपलं प्रेम हे असं 'socially' व्यक्तच केलं नसतं!!
इतरांवरचं आपलं प्रेम हे अगदी पूर्णपणे झूट वगैरे नसलं तरी हे ही तेवढंच खरं की सर्वात जास्त प्रेम हे आपलं स्वतःवरच असतं. म्हणजे खरं तर आयुष्यभर, अगदी रोज, आपणच आपले खरे valentine असतो!! आणि जोपर्यंत त्याचा चुकीच्या दिशेने अतिरेक होत नाही तोपर्यंत ते तसं असण्यात काही चूकही नाही, उलट काहीसं गरजेचंच आहे. कारण खरं तर आपण स्वतःवर कितीही प्रेम करत असलो तरी खऱ्या अर्थाने आपल्या 'स्व'च्या चांगल्या घडणीला आपल्यापैकी बरेचजण वेळच देत नाहीत. इतरांसाठी बरंच काही करण्याच्या नशेत स्व ची मात्र उपासमारच!
दुसर्या व्यक्तीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी चाॅकलेटस् किंवा महागडी gifts देणं हा जसा वरवरचा उपाय आहे तसंच स्वतःवर प्रेम करणं म्हणजे फक्त भारी भारी कपडे, accessories आणि एकंदरीत बाह्य looks ना महत्व एवढंच नसावं, माझ्या तरी मते. त्यापुढे जाऊन आपल्या आतल्या 'मी' ला घडवण्यासाठी quality time देणं जास्ती महत्वाचं. काही छंद, कला जोपासणं, चांगलं वाचन करणं, निसर्गात जाणं, जमल्यास थोडंफार समाजकार्य, रोज थोडी का होईना पण उपासना करणं, काही काळ तरी शांत बसून स्वतःशी संवाद साधणं हे स्वतःवर खरं प्रेम करणं आणि खऱ्या अर्थाने 'स्वार्थ साधणं'!!
१४ फेब्रुवारीला valentine day साजरा करावा की नाही मला माहिती नाही पण हा असा valentine day नक्की साजरा करावा आणि तो ही अगदी रोज!!!!
मस्त...valentine day ची खरी ओळख समोर येते हे वाचून.रोजच्या negative waves च्या गराड्यात अशा प्रकारे valentine साजरा करत राहीलो तर नक्कीच मन प्रसन्न करणारे गुलाब सोबत करतील.
ReplyDeleteValentine Day Celebration हे पूर्णपणे व्यक्ती सापेक्ष आहे असे माझे स्पष्ट मत. celebration करायचा एक छान दिवस असे आपल्याला त्या दिवसाबद्दल म्हणता येईल
ReplyDeleteMast ch.. agadi barobar
ReplyDelete