Wednesday, February 22, 2017

सोशल लाइफ...

काल कुठेशी एक बातमी वाचनात आली - 'कित्येक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या  मृत्यूच्या बातमीने त्यांच्या ट्वीटर खात्यावर पडला RIP चा पाऊस!' इतर कुठेच ही बातमी नव्हती आणि tv वर पण काही नव्हतं त्यामुळे जरा आश्चर्यानेच मी पुढे वाचायला लागले. तर, त्या बातमीत लिहिलं होतं की कुठल्याशा social site वर काही चुकीने फरीदा जलाल यांच्या प्रोफाईल खाली त्यांच्या जन्म तारखेबरोबरच मृत्यूची तारिख पण दिली होती आणि ती कालचीच होती आणि ते बघून लोकांनी RIP चा अक्षरश: पाऊस पाडला होता. नंतर कळलं की फरीदा जलाल अगदी व्यवस्थित आहेत! म्हणजे अगदी 'आपुले मरण पाहिले म्यां डोळा' अशी अवस्था अनुभवली असेल नाही जलाल बाईंनी?!! मला आठवतंय, अगदी लहानपणी, जेव्हा मरण हि संकल्पना नुकतीच माहिती होऊ लागली होती तेव्हा, मला वाटायचं की आपण मेलं तरी हळूच डोळे उघडून बघता यायला हवं आपल्याला मधेच; म्हणजे आपल्यासाठी कोण किती रडतंय वगैरे बघता येईल आपल्याला! आज ते भाग्य फरीदा जलाल यांना लाभलं बुवा!! आणि हे असं भाग्य लाभलेल्या त्या काही पहिल्याच नाहीत बरं. गेल्या २-३ वर्षांत, शक्ती कपूर, राजपाल यादव यांसारख्या अजूनही काही celebrities च्या बाबतीत असे किस्से घडले आहेत. भाग्यवानच नाही हे सर्व? लोक आपल्यावर किती 'प्रेम' (?) करतात ते यांना 'याची देही याची डोळा' बघता आलं.. 

हे विनोदी नाहीये खरं तर. Social media नावाचं एक वादळ दिवसेंदिवस जास्त जास्तच अक्राळविक्राळ स्वरूप धारण करायला लागलंय. या वादळाने उडवलेली धूळ डोळ्यात - आणि डोक्यातही - गेल्यामुळे , आता आपण नक्की कुठे चाललोय किंवा काय करतोय हे बहुतेक कुणाला कळेनासंच झालंय. त्यामुळेच बहुदा, आपण कुठे काय reaction देतोय, आपण जे फॉरवर्ड करतोय ते खरंच खरं आहे की नाही, त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात याचा साधा विचार करायचं भानही अनेकांना राहिलेलं नाही. आला काही मेसेज की कर Whatsappवर १०० जणांना फॉरवर्ड नाहीतर टाक फेसबुकवर.. दुर्दैवाने, या 'डोकं गहाण टाकून नुसतं येईल ते फॉरवर्ड' करण्याच्या नादात माणसांची ओरिजिनॅलिटी, क्रिएटिव्हिटी हरवत चालली आहे. कारण कितीशी माणसं स्वतः काही विचार करून, लिहून वगैरे पोस्ट करतात? 'बस ईधरका माल उधर'!!

सुरवाती सुरवातीला, एकमेकांपासून दूर गेलेल्या माणसांना जवळ आणण्यासाठी कौतुकपात्र ठरलेल्या या social media चा आता खरोखर अतिरेक झालाय. आता ते दूरचेच इतके जवळचे वाटू लागलेत की खरे जवळचे नजरेआड होत चाललेत. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांशी धडपणे बोलायलाही वेळ नसणाऱ्या माणसांकडे virtual जगतात इतकं ऍक्टिव्ह असायला वेळ कसा असतो हे एक आश्र्चर्यच आहे. अनेक दिवसांनी एकत्र आलेली बहिण-भावंडं, मित्रमंडळी जेव्हा समोरासमोर एकमेकांशी बोलून, मनाने जास्त जवळ येण्याऐवजी एकाच खोलीत बसून, पण आपापल्या मोबाईल्स मधे डोकी खुपसून, त्यावरच्या कुठल्याशा ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी बोलताना (?) दिसतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते खरंच! म्हणजे आपण ज्या व्यक्तीशी virtual माध्यमातून बोलत आहोत ती स्वतः, प्रत्यक्ष, आत्ता या क्षणी आपल्या समोरच आहे आणि आपण तिच्याशी फेस -टू-फेस पण बोलू शकतो हेही विसरायला होत असेल माणसाला? आणि मग त्यातूनच 'नवरा, जेवणाच्या टेबलवर समोरच बसलेल्या बायकोकडे पोळी पण Whatsapp वरूनच मागतोय' अशा प्रकारचे jokes (?) तयार  होतात आणि मग काय? ते पण हजारोंना फॉरवर्ड!!

आपल्या आयुष्यात घडणारी अगदी छोट्यात छोटी आणि खरं तर ज्याने दुसऱ्याला काहीही फरक पडत नाही अशी प्रत्येक घटना social websites वर टाकून पब्लिसिटी मिळवायचं व्यसनच जडलंय हल्ली कित्येकांना.. मग मतदान केल्याचे photos टाकणं म्हणजे तर फारच 'important' गोष्ट! आपण आपलं एक बेसिक कर्तव्य पार पाडलंय हे कळायला नको का जगाला?! कुठल्याही प्रेक्षणीय ठिकाणी जा, माणसांना ते स्थळ, तो परिसर डोळ्यात साठवून घेण्यापेक्षा स्वतःची छबी कॅमेऱ्यात साठवण्यातच जास्ती इंटरेस्ट असतो. आणि मग लगेच त्या छब्या जातात फेसबुकवर. म्हणजे प्रत्यक्ष ते स्थळ बघण्यापेक्षा, 'आम्ही असं असं स्थळ बघून आलो' हे लोकांना कळवण्यातच खरा आनंद! या पब्लिसिटीच्या नादात अगदी खाजगी क्षण सुद्धा चव्हाटयावर आणू लागलेत आजकाल लोक.. बरं, तुम्ही आज काय खाल्लं, कितीला उठलात किंवा कुठली सिरीयल पाहिलीत याच्याशी तमाम जनतेचा काय संबंध? (एखाद्या वेळी काही special असेल तर ठीके, पण रोज रोज?!!) खोटं वाटेल पण फेसबुकच्या एका ग्रुपवर नुकतीच एका महाभागांनी एक पोस्ट टाकली होती - 'आज सकाळी माझा गाल चावला गेला!!!!!!!!' अरे? काय हे? आता फक्त 'लघु किंवा दीर्घ शंकेला जाऊन येत असल्याचे' updates टाकू नयेत कुणी म्हणजे मिळवली!!! हा social mediaचा वापर म्हणायचा की गैरवापर?

खरं पहायला गेलं तर 'social' या शब्दात 'समाजाचा' काहीतरी विचार असणं अभिप्रेत आहे. पण मग, 'socially active' असणारे कितीजण खरंच 'समाजासाठी active' असतात? अगदी 'समाजकार्य' वगैरे राहूचदे पण कित्येक घरांमधे आज अशी परिस्थिती आहे की virtual जगातली नाती जोडण्याच्या नादात घरातल्याच म्हाताऱ्या माणसांशी निवांत बसून चार शब्द बोलायला पण कुणाला फारसा वेळ नाही. समाजकार्य करायचं म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात जाणे वगैरे तर लांबचीच गोष्ट झाली.. हां पण social sites वर सामाजिक विषयांवर गप्पा सुरु करा - सगळे पुढे! नुसत्या कृतीशून्य चर्चा.. 'Social' च्या नावाखाली जास्तीत जास्त 'स्वकेंद्रित' होणं म्हणजे 'socially active' असणं असं गणित झालंय बहुतेक. कुठल्याही गोष्टीप्रमाणे यालाही अपवाद आहेत अर्थात. या 'social media' चा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेऊन काही विधायक करणारे लोक ही आहेत; पण दुर्दैवाने खूपच  कमी. बाकीचे सगळे मात्र 'social' पोस्ट टाकता येण्यासाठीच 'life' जगतात की काय देव जाणे!!       
   

Friday, February 17, 2017

प्रिय अमृता....

कालच माझ्या ज्या बहिणीच्या मुलाच्या मुंजीबद्दल लिहिलं ती माझी मामेबहिण अमृता.. माझी अतिशय लाडकी बहिण! माझ्याहून जवळ जवळ ३ वर्षांनी लहान. पण लहानपणापासूनच आमच्यात खूप जवळिकीचे आणि मैत्रीचे संबंध. काल तिच्या लेकाच्या मुंजीबद्दल लिहीताना, मनात तिच्याच बद्दलचे विचार असल्यामुळे असेल कदाचित, अचानक तिच्याबद्दलच्या भावना कवितेचं रूप घेऊन आल्या! अमृ, ही कविता तुला सप्रेम सादर...


प्रिय अमृता...

गीत आले कुठून अचानक, साज लेऊनी मम भावांचे,
गूज मनीचे सांगायाला, तू स्थान माझे हक्काचे..
जन्मलो बहिणी म्हणूनी, परी नाते जपले मैत्रीचे...

किती वेगळ्या तरी किती सारख्या,
जिवाभावाच्या आपण सख्या..
वेगळेपण जपून दुसरीचे, नाते जपले सख्याचे...

ना सहवास रोजचा, ना सततच्या भेटीगाठी,
तरी मनाचा एक कोपरा राखलेला तुझ्यासाठी..
दूर अशा अंतरावरूनही, नाते जपले जवळिकीचे...

लागो दृष्ट ना कधी, राहो अभंग हे नाते,
वितुष्ट न येवो काही, देवाकडे हेच मागते..
गोडी राहो अनंत काळ, नाते जपले 'अमृता'चे!!!


मुंज सोहळा...

चार दिवसांपूर्वी आमच्या खूप जवळच्या नात्यात, म्हणजे 'अगदी आमच्याच घरातल्यासारखं' म्हणतो ना आपण तशा जवळच्या नात्यात, मुंज होती - माझ्या बहिणीच्या मुलाची, वेदांगची. खूप दिवसांनी इतक्या जवळच्या नात्यातलं कार्य होतं. त्यामुळे मस्त enjoy करून घेतलं बऱ्याच दिवसांनी! सध्याच्या धकाधकीच्या lifestyle मुळे लवकर जायचं म्हणलं तरी फार काही लवकर जाता आलंच नाही. तरी २ दिवस आधीपासून तळ ठोकलाच आम्ही तिच्याकडे! आणि  मग सुरवात झाली धमाल करायला! मुळात, आम्हा बहिणींना हसायला एवढं तेवढं कारणही पुरतं  नेहमीच; त्यात इतक्या दिवसांनी इतके सगळे एकत्र आल्यावर मग काय विचारता?  

गेल्यावर, बहिणीला मदत करत करत simultaneously च भेंडया, मग हसाहसी, गप्पा, मग हसाहसी असं सगळं सुरूच झालं. त्यात आमचा ५ वर्षांचा हिरो - ईशान - काही ना काही चाळे करून सगळ्यांकडून कौतुक करवून घेत होता! कुठे, कसं impression मारावं आणि भाव खाऊन घ्यावा हे न शिकवताच कसं येतं देव जाणे! मला वाटतं, बाबा कडून घेतली असावी ही कला लेकाने! कारण या २ दिवसांत आमच्या नवरोजींनी पण जे काही impression पाडलंय म्हणता सगळ्यांवर! 'आमचा जावई अगदी गुणाचा आहे हो, कुठल्याही कामाला मागे नाही' हे वाक्य १०० दा तरी ऐकवलं असेल मला वेगवेगळ्या लोकांनी.. शेवटी मला वाटायला लागलं की यातल्या किमान दोघा - चौघांना तरी आपल्या बरोबर घरी घेऊन जावं - कर म्हणावं जावयाला काय ती कामं! 

मुंजीच्या आदल्या दिवशी ग्रहमक होतं. तेव्हापासून कार्याला सुरवात झाली. मुहुर्तमेढ रोवणं, देवक ठेवणं, होम अशा सगळ्या विधींनी वातावरण अगदी प्रसन्न  झालं. मुंडावळ्या बांधलेला वेदांग किती गोड दिसत होता म्हणून सांगू! पूर्ण विधी होईपर्यंत अगदी शांत बसून राहिला होता.   

त्या दिवशी कित्ती कित्ती दिवसांनी बांगडया भरायला आलेल्या कासार मावशींकडून हातात मस्त हिरव्या बांगडया भरून घेतल्या. खूप पूर्वी कधी तरी ऐकलं होतं की हातात चुडा भरून देणाऱ्या कासारणीच्या पाया पडायचं असतं. कसं काय कोण जाणे पण त्या क्षणी अचानक ते आठवलं आणि त्या मावशींना नमस्कार केला. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्या छोटयाशा कृतीचं महत्व पटलं आणि मला ती बुद्धी दिल्याबद्दल देवाचे आभार मानले! नंतर मेंदी प्रोग्रॅम झाला. अगदी कितीही मॉडर्न मुलगी असूदे पण मेंदीने रंगलेला हात आणि त्यात हिरव्या बांगडया कशा खुलून दिसतात ना? आपलेच हात अधून-मधून सारखे निरखावेसे वाटतात! 

ऐन वेळपर्यंत चाललेली काही ना काही तयारी, कुणीतरी उशीरा येणारे पाहुणे, राहिलेल्यांची मेंदी, त्यात गप्पा, हसाहसी, मधेमधे पोराटोरांचे गोंधळ, मग 'चला झोपा रे लवकर, उद्या लवकर उठायचंय ना?' असा ज्येष्ठांनी दिलेला दम (अगदी आम्हा मोठ्ठयांनाही) अशा अगदी टीप्पीकल 'कार्य'वाल्या वातावरणात एकदाचा दिवस-  खरं तर जवळ जवळ अर्धी रात्र - संपवून पहाटेच्या प्रतिक्षेत जेमतेम २-३ तासांसाठी झोपायला गेलो तेव्हाही मन उत्साहातच होतं!

मग main मुंजीच्या दिवशीची धांदल तर काय विचारता? प्रत्येकाला  लवकरात लवकर आवरून तयार होण्याची घाई.. त्यात आमच्यासारख्या लेकुरवाळ्यांना तर स्वत:चं आवरून शिवाय पिल्लाचं ही आवरायचं असल्यामुळे double दंगा! पोरांना मस्त मस्त ट्रेडिशनल कपडे - स्वतःच्याच हौसेखातर खरं तर - चढवून, त्यात त्यांना uncomfortable वाटत असेल आणि त्यांची तक्रार असेल तरी 'तुला हेच कसं छान दिसतंय'  हे त्यांना पटवून देऊन, त्या घाईत पण मधेच लाडाने त्यांचे फोटो काढण्याचं "महत्वपूर्ण" काम करत करत स्वतःचं आवरायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे?! आवरून झाल्यावर स्वतःचं  रूप usually पसंत पडत नाहीच.. बरं, प्रत्येकजण दुसरीला म्हणणार, 'wow! किती सुंदर दिसतीयेस तू! नाहीतर मी , अवतार नुसता!!' म्हणजे आता मला वाटतंय की त्या दिवशी एक तर सगळ्याच जणी 'किती सुंदर' तरी दिसत असाव्यात किंवा एकजात सगळ्या 'अवतार' तरी!! :P :D        

आवराआवरीच्या सर्व दीव्यांमधून पार पडून मुंजीच्या हॉल वर पोहोचलो. तिथे स्टेजवर 'झाडाखाली बसलेले एक ऋषी आणि त्यांच्यासमोर अध्ययनाला बसलेले ३-४ बटू' असे cutouts बनवून खूप सुंदर देखावा उभा केला होता. एकदम वेद काळात गेल्यासारखं वाटलं! त्या सगळ्या बटूंच्या पुढयात बसलेला आमचा छोटा बटू कसा तेजस्वी वाटत होता! 

एकदा स्टेजवर विधी सुरु झाले की लागेल तेवढी थोडीफार मदत करण्याशिवाय आम्हाला काय काम? मग काय गप्पा, हास्यविनोद आणि आजूबाजूचं निरीक्षण.. अशा कार्याच्या वेळी जमलेल्या, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे नुसतं शांतपणे लांबून बघणं ही  पण एक खास मजा असते. किती वेगवेगळे नमुने बघायला मिळतात! आमच्या वेदांगला चांगल्या ४ पणज्या आहेत. त्या सगळ्याजणी अगदी कृतार्थ चेहेऱ्याने सगळे कार्यक्रम बघत बसल्या होत्या - मधूनच कुणी भेटायला येईल त्याला आशीर्वाद देत आणि आपण जे समजून आशीर्वाद दिला तीच ही व्यक्ती होती ना नक्की याचा नंतर विचार करत!! :D आज्जी कॅटेगरीच्या बायका एकीकडे आपल्या नातवंडांना आणि एकीकडे आपल्या आईला सांभाळत, आपल्या बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या लेकी किंवा बहिणी वगैरेंशी गप्पा मारत कार्यक्रमाचा आनंद लुटत होत्या. त्यानंतर आमच्यासारख्या ज्या लेकुरवाळ्या मावश्या, माम्या, आत्या होत्या त्या थोडीफार मदत करत, 'आता आपले काही तरुणपणाचे दिवस राहिले नाहीत' च्या अविर्भावात, पण तरीही एकीकडे 'अगदीच outdated वाटू नये' असाही प्रयत्न करत, जास्ती करून मुलाबाळांबद्दल गप्पा मारत, मधेच आपापल्या नवऱ्याकडे कटाक्ष टाकत enjoy करत होतो! त्याहून लहान अशा नवतरुण मावश्या, आत्या किंवा ताया यांची मजाच काही और! त्या आपले सगळे साजशृंगार सांभाळत, भिरभिर नजरेने, आपल्याला कोण कोण न्याहाळतंय याचा अंदाज घेत, फुलपाखरासारख्या इकडून तिकडे तरंगत होत्या!! अगदी छोटया आपल्या निरागसपणे पळापळी करत चिवचिवत होत्या. पुरुषांचं सगळ्यांचं साधारण सारखंच, फार काही सांगणे न लगे!

आमचा  आपला खाली टाईमपास चाललेला असताना स्टेजवर वेदांग अन त्याचे बाबा मुंजीचे विधी पार पाडत होते. खरं तर २-३ दिवसांपासून चाललेली सगळी धावपळ, जागरणं, वेगवेगळं खाणं यामुळे वेदांगची तब्येत नेमकी त्या दिवशी जरा बरी नव्हती; पण बिचाऱ्याने कुठेही चिडचिड, रडरड न करता, अगदी समजुतदारपणे पूर्ण सहकार्य केलं. अगदी गुणी बाळ! त्यामुळे माझ्यासारख्या समस्त मातृवर्गाला, नेहमीप्रमाणे, आपापल्या पोरांना द्यायला एक नविन उदाहरण मिळालं - 'बघितलंस ना, एवढा त्रास होऊन पण वेदांग दादा कसा शहाण्यासारखा वागतोय ते?!!' अर्थात पोरांना बरोबर कळतं कुठल्या बाबतीत कुणाचं अनुकरण करायचं ते.. 

तेवढी वेदांगची तब्येत सोडली तर बाकी सगळा कार्यक्रम अगदी दृष्ट लागण्यासारखा झाला! सगळ्यांनी आपापल्या परीने भरपूर enjoy केलं. असे प्रसंग अधून मधून सतत यायला हवेत, एकदम रिफ्रेश व्हायला होतं. म्हणूनच की काय देव जाणे पण आमच्याही नकळत आमचा लेक सगळ्यांना 'पुढच्याच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या' (?) त्याच्या मुंजीचं आमंत्रण देऊन आलाय म्हणे!!!                    

  

Thursday, February 16, 2017

I MISS YOU...

They said, 'you look beautiful today',
How I wished You were there too...

They said, 'you smile soo sweetly',
I smiled again, thinking of You...

'Your eyes look beautiful while smiling', they said,
My eyes kept on looking for You...

'Actually', they said, 'something is different than usual',
The difference, I knew, was because of You...

They kept on saying, they kept on praising,
I wished to hear it all from You...

‘But, you are so silent today,’ said one,
I heard my mind communicating with You...

The fun went on, they enjoyed so much,
I felt so lonely in the crowd without You...

I talked to them and I laughed too,
But deep in my heart, I just missed You...

प्रेम म्हणजे...

Valentine day बद्दल लिहिताना अचानक खूप पूर्वी केलेल्या दोन कविता आठवल्या. त्या इथे पोस्ट करण्याचा मोह  होतोय. पैकी ही कविता तर खूपच जुनी म्हणजे ९७ साली, मी ११वी मधे असताना केलेली आहे. 

प्रेम म्हणजे... 

प्रेम म्हणजे काय असतं?
कुणालाच ते माहित नसतं!

सगळे नाना तर्क करतात,
प्रेमाला निरनिराळी नावे देतात.. 
पण खरंच प्रेम म्हणजे काय असतं?
कुणालाच ते माहित नसतं!

प्रेम  असते देवाची देणगी,
प्रेमात माणूस बनतो त्यागी.. 
प्रेम सुंदर कोमल भावना!
मनोदैवताची मूक आराधना.. 
प्रेम कसं, बहुरूपी असतं,
कधी असं तर कधी तसं असतं.. 
प्रेम पाण्याप्रमाणे शुद्ध असतं,
प्रेम स्फटिकाप्रमाणे निर्मळ असतं.. 
प्रेम म्हणजे जीवन असतं,
प्रेम म्हणजे सबकुछ असतं!

प्रत्येकजण असा काहीतरी विचार करतो,
आपापलं मत सांगून जातो.. 
पण खरंच प्रेम म्हणजे काय असतं?
कुणालाच ते माहित नसतं!

खरंच, प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे फक्त प्रेमच असतं!
प्रेम म्हणजे काय ते जाणून घ्यायचंच नसतं,
प्रेमाचं सुंदर विश्र्व फक्त अनुभवायचं असतं!!!

Wednesday, February 15, 2017

Valentine Day...

काल १४ फेब्रुवारी - valentine day! बरेच लोक बर्‍याच दिवसांपासून ज्याची वाट पहात होते तो दिवस काल एकदाचा आला (आणि गेलाही)!! सोशल मेडियामुळे अजून काही दिवस या ना त्या मार्गाने स्मृती रेंगाळत राहतील या दिवसाच्या अन् मग दुसरा काही hot topic पुढे आला की हळूहळू हा विषय मागे पडेल - पुढच्या वर्षीच्या valentine day पर्यंत..

मला आठवतंय, मी साधारण आठवी - नववीत असताना पहिल्यांदा valentine day बद्दल ऐकलं. तेव्हा काही त्याची फार craze वगैरे वाटली नाही तरी उगीचच एक अगदी हलकीशी उत्सुकता निर्माण झालीच. तेव्हा आमच्याकडे TOI की Indian Express असा कुठलासा इंग्रजी पेपर यायचा आणि त्यात एक अख्खी मोठी पुरवणी यायची या valentine  day च्या निमित्ताने. त्या पुरवणीमधे मोठमोठे रकाने भरभरून 'from me to you' अशा प्रकारचे मेसेजेस असायचे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या आपल्या प्रेम भावना या माध्यमातून व्यक्त करायच्या - कुणी एखादा शेर, कुणी कवितेच्या ओळी, कुणी एखादं फिल्मी गाणं तर कुणी नुसतंच 'I love you'! जाम मजा यायची मला ते वाचताना!! :D 'हा संदेश ज्या व्यक्तीसाठी आहे तिच्यापर्यंत तो खरंच पोहोचत असेल का? मग तिला काय वाटत असेल?' वगैरे गोष्टींवरून काहीतरी चर्चा सुरू होऊन मग आम्हा मित्रमैत्रिणींच्या टोळक्यात चिक्कार हसाहसी व्हायची. एकंदरीत पाहता, नव्यानेच माहित झालेलं हे प्रकरण थोड्याफार उत्सुकतेचं आणि जास्त करून थट्टेचंच होतं.

काॅलेज मधे गेल्यावर मग जरा सगळे संदर्भ बदलायला लागले! आजुबाजूच्यांचं पाहिलं की काही गोष्टी आपल्याही आयुष्यात याव्यात असं मधूनच वाटायला लागलं. ग्रुपमधे कुणाच्या 'जोड्या जुळवा' ला यश मिळालं की उगीचच पोटात गुदगुल्या वगैरे होऊ लागल्या. अशांची valentine day celebrations पाहिली / ऐकली की आपलाही कुणीतरी 'valentine' असावा (म्हणजे नक्की काय आणि कसा याच्या  कल्पना मुळीच स्पष्ट नव्हत्या!) असं वाटायचं. मग त्या धुंदीत उगीच आपलं काही कविता बिवीता पण केल्या! : P एकुण काय तर सगळा स्वप्नील मामला!! :D

पण त्या काळची दुसरी एक गंमत मला आठवतीये ती म्हणजे आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच एकमेकींना चाॅकलेटस् द्यायचो. घरी आई-बाबा, दादाला तर द्यायचेच मी पण माझ्या मांजरांना पण valentine day निमित्त special treat मिळायची! 'प्रेम म्हणजे काय फक्त 'तसलंच' असावं का? आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे असं कुणीही आपलं valentine असू शकतं' वगैरे dialogues ही असायचे जोडीला!

नंतर हळूहळू जसं वय वाढत गेलं तशा प्रेमाच्या व्याख्याही बदलल्या आणि त्याच्या celebrationच्या कल्पनाही. वरवरच्या सादरीकरणापेक्षा नात्यांमधली खोली (depth), घट्ट वीण जास्ती महत्वाची वाटायला लागली. अन् मग valentine day साजरा करायची गरज आणि इच्छाही आपोआप कमी व्हायला लागली. हल्ली तर मला हा दिवस आलाय हेही लक्षात रहात नाही बरेचदा... पण तरीही नवर्‍याने अचानक एखादी, भले अगदी छोटीशीच,  कॅडबरी आणून surprise दिलं तर आपल्याला तरी ते आवडतं बुवा!!

मला वाटतं, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने थोडा change हवा असतो सगळ्यांनाच; जरा मौजमस्ती करायला मिळाली की बरं वाटतं. पण या सगळ्याहून महत्वाचं म्हणजे दुसर्‍याकडून स्वतःचं कोडकौतुक करून घ्यायला आवडतं प्रत्येकालाच! कुणीतरी लक्षात ठेवून आपल्यासाठी काही करतंय हे सुखावणारं असतं. हल्लीच्या काळात तर आपल्या या सुखसोहळ्याचं इतर लोकांकडूनही कौतुक करून घ्यायला पण फारच आवडू लागलंय लोकांना.. फेसबूकवर प्रचंड प्रमाणात upload झालेले 'प्रेमळ' फोटोज हे याचं अगदी बोलकं उदाहरण आहे! हे फोटोज आपल्या valentine वरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आहेत असं प्रत्येकाला कितीही वाटत असलं (आणि ते अजिबातच नाही असं मी म्हणतही नाही) तरी त्यामागे कुठे ना कुठे आपल्या friend circle कडून भरपूर likes मिळवण्याचा म्हणजेच स्वतःचं कौतुक करून घेण्याचाच उद्देश असतो. तसं नसतं तर माणसांनी आपलं प्रेम हे असं 'socially' व्यक्तच केलं नसतं!!

इतरांवरचं आपलं प्रेम हे अगदी पूर्णपणे झूट वगैरे नसलं तरी हे ही तेवढंच खरं की सर्वात जास्त प्रेम हे आपलं स्वतःवरच असतं. म्हणजे खरं तर आयुष्यभर, अगदी रोज, आपणच आपले खरे valentine असतो!! आणि जोपर्यंत त्याचा चुकीच्या दिशेने अतिरेक होत नाही तोपर्यंत ते तसं असण्यात काही चूकही नाही, उलट काहीसं गरजेचंच आहे. कारण खरं तर आपण स्वतःवर कितीही प्रेम करत असलो तरी खऱ्या अर्थाने आपल्या 'स्व'च्या चांगल्या घडणीला आपल्यापैकी बरेचजण वेळच देत नाहीत. इतरांसाठी बरंच काही करण्याच्या नशेत स्व ची मात्र उपासमारच!

दुसर्‍या व्यक्तीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी चाॅकलेटस् किंवा महागडी gifts देणं हा जसा वरवरचा उपाय आहे तसंच स्वतःवर प्रेम करणं म्हणजे फक्त भारी भारी कपडे, accessories आणि एकंदरीत बाह्य looks ना महत्व एवढंच नसावं, माझ्या तरी मते. त्यापुढे जाऊन आपल्या आतल्या 'मी' ला घडवण्यासाठी quality time देणं जास्ती महत्वाचं. काही छंद, कला जोपासणं, चांगलं वाचन करणं, निसर्गात जाणं, जमल्यास थोडंफार समाजकार्य, रोज थोडी का होईना पण उपासना करणं, काही काळ तरी शांत बसून स्वतःशी संवाद साधणं हे स्वतःवर खरं प्रेम करणं आणि खऱ्या अर्थाने 'स्वार्थ साधणं'!!

१४ फेब्रुवारीला valentine day साजरा करावा की नाही मला माहिती नाही पण हा असा valentine day नक्की साजरा करावा आणि तो ही अगदी रोज!!!!    

Thursday, February 9, 2017

Reaction...

सकाळची घाईची वेळ. आमचं ५ वर्षांचं छोटं parcel व्यवस्थित pack and wrap होऊन शाळेत पोहोचेपर्यंत सगळं घर गॅसवर असतं!! अशात त्याच्याकडून काही विषयबाह्य प्रश्रनावली सुरू झाली की मग विचारायलाच नको.. डोकं शांत ठेवून आणि दहा हातांनी कामं उरकत खिंड लढवावी लागते!

तर आजचा hot topic होता 'action आणि reaction'. कुठल्यातरी संदर्भात साहेबांनी २-३दा action च्या ऐवजी चुकून reaction शब्द वापरला. त्या घाईच्या वेळी उगीच विषय वाढायला नको महणून आम्ही चक्क कानाडोळा करायचा प्रयत्न केला आधी; पण परत झाल्यावर, न राहवून, त्याची चूक दुरूस्त केली आणि वेळेच्या दृष्टीने पाहता स्वतः स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली! मग 'reaction म्हणजे काय?' हे आलंच ओघानं. त्याच्या बाबांनी आणि मी जमेल तसं, विषय लवकरात लवकर उरकण्याच्या दृष्टीने त्याला क्रिया- त्यावरची प्रतिक्रिया वगैरे काय काय तरी सांगितलं. उदाहरण म्हणून 'तू चुकीचं वागल्यावर आम्ही रागावतो ही आमची reaction अन् आम्ही रागावल्यावर तू भोकाड पसरतोस ही तुझी reaction' वगैरे त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी पण सांगितल्या आणि 'विचाराधीन' अवस्थेत स्वारी शाळेला रवाना  झाली.

वादळानंतरच्या या शांततेचा उपयोग थंड डोक्याने, शांतपणे स्वतःशी संवाद साधण्यासाठी होतो. आज डोक्यात 'action-reaction' चा विषय होता. आपण त्याला त्याच्या वयाच्या मानाने बर्‍यापैकी चांगल्या पद्धतीने समजावलं वगैरे फुशारकी मारायला मनाने सुरवात केली. पण त्याला सांगितलेल्या उदाहरणाचा विचार करता करता मात्र अचानक काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागलं. आपण त्याला दुसरं चांगलं उदाहरण देऊ शकलो असतो खरं तर अशी चुटपुट लागली. 'तू अमूक अमूक छान वागल्यावर आम्ही तुला जवळ घेतो, लाड करतो ही आमची  reaction आणि त्यामुळे तुला खूप आनंद होतो अन् तू अजून चांगलं वागायचा प्रयत्न करतोस ही तुझी reaction' किंवा 'परवा गॅदरिंग मधे तू खूप छान गायलास या तुझ्या action वर प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजवून कौतुकाची reaction दिली किनी?' असं काहीतरी positive उदाहरण द्यायच्या ऐवजी आम्हाला चुकीच्या वागण्याचं negative उदाहरण का द्यावंसं वाटलं? पटकन तेच का सुचलं? आता - किमान अजून काही दिवस तरी - reaction या शब्दाचा विचार करताना त्याच्या मनात negative छटेच्या भावनाच येतील कदाचित..

हा प्रसंग तसा अगदीच छोटासा पण त्यातून आपल्या मनाचा कल दिसतो का? आपल्याला सामान्यतः negative गोष्टीच उगाळायला आवडतं का? आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांबद्दलही तर असंच होतं आपलं बरेचदा. एखादी व्यक्ती आपल्याशी कितीही चांगली वागली असेल तरी समजा एखादी गोष्ट ती आपल्याला न पटेल असं वागली तर तेच साधारणपणे आपल्या जास्त लक्षात राहतं. ती व्यक्ती समोर आली की आधी ते नको तेच आठवतं. आणि त्याहून वाईट म्हणजे चांगल्या गोष्टींच्या बाबतीत कदाचित दगा देणारी आपली स्मरणशक्ती negative गोष्टींच्या बाबतीत मात्र अगदी जबरदस्त काम करते - अगदी वर्षानुवर्षे मनात जपून ठेवल्या जातात अशा गोष्टी. बापरे! कसली dustbin होत असेल आपलं मन म्हणजे!

ओळखीतल्या माणसांचं राहूदे एक वेळ पण आजकालच्या social networking च्या जमान्यात तर आपण प्रत्यक्ष कधीच न भेटलेल्या आणि कदाचित संपूर्ण आयुष्यात कधीच प्रत्यक्ष समोर येणार नाहीत अशा अनोळखी लोकांबद्दलही काही आकस निर्माण करून ठेवतो मनात - काही साध्याशा virtual संवादांवरून. एखाद्या सुंदर निसर्ग देखाव्याच्या किंवा निखळ आनंदाच्या post ला जितकी दाद मिळते त्यापेक्षा कितीतरी जास्त attention / comments एखाद्या वादावादीच्या post ला मिळतात! आपल्याला नकारात्मकता वाढवायला, जोपासायला आवडतं का?

आपल्याला वाटतं की आपण त्या त्या वेळची नकारात्मक भावना नंतर लगेच सोडून देतो, विसरून जातो पण खरं तर त्या प्रत्येक गोष्टीचा, हलका का होईना, ओरखडा आपल्या मनात रहातच असावा. म्हणून तर कधी तरी आपल्याही नकळत, आपल्यालाच आश्र्चर्य वाटेल अशा काही negative reactions आपल्याकडून येतात. कारण जे आपल्यात आत भरलं असेल तेच बाहेर येणार ना?

हे टाळण्यासाठी, मला वाटतं, अगदी ठरवूनच प्रयत्न करायला हवेत. छोट्या छोट्याशा प्रसंगांमधेही सकारात्मक काय असेल ते जाणूनबुजून शोधावं लागेल. सकारात्मक गोष्टी, भावना मनात कोंबून भरल्या पाहिजेत, जेणेकरून नकारात्मकतेला जागाच उरणार नाही; आणि मग आयुष्य आत्ता आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त आनंदी आणि शांत होईल! मी माझ्या लेकाकडून काही चांगल्या, सकारात्मक वागण्याची अपेक्षा करत असेन तर आधी मला सकारात्मकताच पेरावी लागेल ना?

चला, हिरो यायची वेळ झाली पण! आता हळूच गप्पा मारता मारता त्याच्या मनातला negativity चा हलकासा ओरखडा पुसून टाकायचा प्रयत्न करायला पाहिजे.......

Tuesday, February 7, 2017

श्रीगणेशा...

बरेच दिवस झाले, मनाने सतत भुणभुण लावलीये की कित्ती दिवसात हातून काही लिखाण झालं नाही, असं कसं चालेल? पण मी आपलं जरा दुर्लक्षच केलं खरं तर.. पण आज  मात्र मनाने फारच उचल खाल्ली आणि अचानकच मलाही राहवेना.
माझ्या लिखाणातून माझं व्यक्त होणं हा माझा एक टाळता न येण्यासारखा अविभाज्य भाग  आहे. खरंच, बरेचदा, आपण काही लिहिणं हे इतर कुणी वाचावं म्हणून नसतंच बहुतेक; ते आपल्याच आपल्याशी चाललेल्या संवादाचं प्रकटीकरण असतं.. त्यामुळेच मी लिखाणापासून लांब गेल्याने 'इतर लोक फार चांगल्या कलाकृतीला मुकले' वगैरे काही होणार नसलं तरी तो मी स्वतःवर केलेला अन्याय नक्कीच असेल.. And how can I do injustice to myself? :P

म्हणून आता ठरवलंय, पुन्हा लेखणी (की-बोर्ड) सरसावायची आणि लिखाणातून व्यक्त व्हायचं! काही जुनंच लिहिलेलं, काही नव्याने सुचलेलं एकत्र मांडायचं... बघूया कितपत टिकतोय हा निश्चय... एवढं लिहून श्रीगणेशा तर झाला!!!