Thursday, November 24, 2022

Social Life...

"चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, गेली अनेक वर्षं मराठी, हिंदी चित्रपटांमधून आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले ह्यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दुःखद निधन" अशा अर्थाच्या बातम्या काल रात्री whatsapp वर एकापाठोपाठ एक येऊन धडकायला लागल्या तेव्हा, पटकन, पहिली प्रतिक्रिया आली, 'अरे, आज दुपारीच तर वाचलेलं मी, त्यांना admit केल्याचं'. म्हणजे अर्थात, admit केल्यावरही लगेच जाऊच शकतो माणूस; पण जुने काही अनुभव गाठीशी असल्यामुळे, आधी शहानिशा करावी म्हणून google उघडलं. तर तिथे अनेक प्रसिद्ध वर्तमानपत्रं आणि channels वाल्यांनी हे officially declare करणाऱ्या बातम्या टाकल्या होत्या. अहो, एवढंच काय, बातमी आल्या आल्या काही वेळात बघितलं तर विकिपीडिया वर पण 'date of death' वगैरे update केलेली!!! 🙄🙄 का कोण जाणे, पण तेव्हा काही मला श्रद्धांजलीचा status वगैरे ठेवावासा वाटला नाही. आणि तो तसा वाटला नाही हे किती उत्तम झालं हे आज उठल्यावर कळलं. विक्रम गोखले अजून जिवंत आहेत अहो!!

हल्ली तशी प्रत्येकालाच प्रचंड घाई असते 'socially react' होण्याची; पण ह्या case मध्ये, सामान्य माणसांना तरी काय म्हणणार? कारण मोठमोठ्या वर्तमानपत्रांनी, channel वाल्यांनी officially ह्या बातम्या टाकल्या होत्या. कित्येक celebrities नी पण twitter वरून श्रद्धांजली वाहिली होती, अजूनही वहात आहेत! त्यामुळे लोक तरी अजून काय शहानिशा करणार? पण मग ज्या media वाल्यांनी ह्या बातम्या दिल्या, त्यांनी जास्त सजग असायला नको? त्यांची काहीच जबाबदारी नाही? 

का एवढी घाई होत असेल ह्या media वाल्यांना, एखाद्याच्या मृत्यूची बातमी cover करण्याची? नाही म्हणजे, अजूनही विक्रम गोखलेंची प्रकृती तशी गंभीरच आहे आणि खरंच काहीही होऊ शकतं वगैरे असेलही खरं - ते बरे होऊन, त्यांना दीर्घायु लाभो ही प्रार्थना - पण अजून तरी धुगधुगी का होईना आहे ना??? मग का घाई ह्यांना? 😡😡😡 चुकून आपल्याआधी इतर कुणी ही बातमी दिली तर आपण स्पर्धेत मागे पडायला नको म्हणून?

गेल्याच महिन्यात facebook, youtube वगैरे अनेक ठिकाणी, जिथे तद्दन फिल्मी बातम्यांचं पेव फुटलेलं असतं, तिथे बातमी होती प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र ह्यांचे निधन! अनेक ठिकाणी होती ही बातमी आणि मुख्य म्हणजे गोलात 'jumping jack जितेंद्र' ह्यांचा फोटो वगैरे. Usually, मी असल्या बातम्यांच्या नादी लागत नसते; पण अनेक ठिकाणी, फोटोसकट दिसल्यामुळे एके ठिकाणी वाचलीच बातमी... तर आतमध्ये लिहिलेलं होतं 'Black Friday fame अभिनेते जितेंद्र शास्त्री ह्यांचे निधन झाले आहे.' संताप झाला माझा हे वाचून!! अरे, फक्त लोकांना attract करण्यासाठी, तुम्ही same नावाच्या, एका जास्त प्रसिद्ध, पण जिवंत अभिनेत्याचा फोटो लावणार मृत्यूच्या बातमीवर??? किती खालच्या दर्जाचं आहे हे सगळं!!

प्रत्येक व्यावसायिकाला आपला व्यवसाय वाढवायचा असतो आणि त्यासाठी तो काही ना काहीतरी शक्कल लढवत असतो. पण म्हणून खप वाढावा, viewer count वाढवा, म्हणून काहीही करणार का? इतकी cheap mentality झालीय आजकाल आपली? म्हणजे कुठल्याही घटनेची पहिली बातमी कोण देणार, कोण 'सगळ्यात तेज' आहे ह्याची इतकी अहमहमिका लागलेली आहे की, ती घटना प्रत्यक्ष घडलीय का नाही हे न बघताच बातमी देऊन मोकळे!! आणि मग पुढे त्यावर चर्वितचर्वण करायला आहेतच 'social media platforms'! 
 
ह्या case मध्ये, श्रद्धांजलीचे status वगैरे ठेवणाऱ्या सामान्य लोकांची चूक नसेल एक वेळ; पण एकूणच आपल्यालाही सगळ्यांना हल्ली व्यक्त होण्याची - 'socially व्यक्त होण्याची' प्रचंड घाई झालेली असते - socially हे जास्त महत्वाचं. कारण प्रत्यक्षातल्या, जवळच्या माणसांबरोबर connect होणं मात्र अवघड होतं चाललंय बऱ्यापैकी, जे खरं तर खूप गंभीर आहे. सध्या चालू असलेल्या 'श्रद्धा case' मध्येही हेच तर दिसून आलंय.
आभासी जगाचं जास्त आकर्षण निर्माण झाल्यामुळे वास्तवापासून कुठेतरी दूर जातोय का आपण? सगळ्यांचं नक्कीच होत नसेल असं, पण तरीही अशांचं प्रमाण जास्त आहे एवढं नक्की...
सखोल अभ्यास करून, काही संशोधन करून, त्यावर मनन करून social media वर लिखाण किंवा video रूपाने व्यक्त होणारे नक्कीच आहेत; पण फारसा कुठल्याच विषयाचा धड अभ्यास नसताना, फार काही विचार न करता, इकडचं-तिकडचं ऐकून, वाचून, अर्धवट ज्ञानावर इथे तिथे comment रूपाने व्यक्त होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे एवढं नक्की...
खूप सुंदर आशय तसंच मांडणी असलेले reels किंवा video बनवणारे नक्कीच आहेत, पण खपतायत म्हणून काहीही निरर्थक, पांचट reels बनवणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे एवढं नक्की...

'करणारे करतात आणि बघणारे बघतात, आपल्याला काय?' असं म्हणून हा विषय सोडून देणं सोप्पंय तसं, पण वाईट वाटतं की ह्या सगळ्याचा परिणाम वैयक्तिक न राहता, एकंदरीत एक समाज म्हणून आपला दर्जा खालावत चाललाय. गुणवत्ता गुंडाळून ठेवलीय आपण आणि संवेदनशीलता संपत चाललीय आपल्यातली... एखाद्याच्या मृत्यूच्या बातमीची post असली तरी त्यावरही दात काढणारे महाभाग असतात... 'मी काहीही करेन, माझी मर्जी!' ही वृत्ती वाढत चाललीय. 

मी पुन्हा म्हणेन की ह्याचा अर्थ सगळीकडे, सगळं फक्त नाकारात्मकच घडतंय असं नाही. Social media चे फक्त तोटेच आहेत असं मुळीच नाही. फक्त आपले लगाम ह्या भस्मासुराच्या हातात न देता, त्याचे लगाम आपल्या बुद्धीच्या ताब्यात ठेवले पाहिजेत!!! 


© रश्मी पानसे - नाझिरकर

(ह्याच संदर्भात काही वर्षांपूर्वी, मला वाटतं 2017 साली, अजून एक लेख लिहिला होता मी. तो ही इथे share करत आहे.)

============================================

काल कुठेशी एक बातमी वाचनात आली - 'कित्येक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या  मृत्यूच्या बातमीने त्यांच्या ट्वीटर खात्यावर पडला RIP चा पाऊस!' इतर कुठेच ही बातमी नव्हती आणि tv वर पण काही नव्हतं त्यामुळे जरा आश्चर्यानेच मी पुढे वाचायला लागले. तर, त्या बातमीत लिहिलं होतं की कुठल्याशा social site वर काही चुकीने फरीदा जलाल यांच्या प्रोफाईल खाली त्यांच्या जन्म तारखेबरोबरच मृत्यूची तारिख पण दिली होती आणि ती कालचीच होती आणि ते बघून लोकांनी RIP चा अक्षरश: पाऊस पाडला होता. नंतर कळलं की फरीदा जलाल अगदी व्यवस्थित आहेत! म्हणजे अगदी 'आपुले मरण पाहिले म्यां डोळा' अशी अवस्था अनुभवली असेल नाही जलाल बाईंनी?!! मला आठवतंय, अगदी लहानपणी, जेव्हा मरण हि संकल्पना नुकतीच माहिती होऊ लागली होती तेव्हा, मला वाटायचं की आपण मेलं तरी हळूच डोळे उघडून बघता यायला हवं आपल्याला मधेच; म्हणजे आपल्यासाठी कोण किती रडतंय वगैरे बघता येईल आपल्याला! आज ते भाग्य फरीदा जलाल यांना लाभलं बुवा!! आणि हे असं भाग्य लाभलेल्या त्या काही पहिल्याच नाहीत बरं. गेल्या २-३ वर्षांत, शक्ती कपूर, राजपाल यादव यांसारख्या अजूनही काही celebrities च्या बाबतीत असे किस्से घडले आहेत. भाग्यवानच नाही हे सर्व? लोक आपल्यावर किती 'प्रेम' (?) करतात ते यांना 'याची देही याची डोळा' बघता आलं.. 

हे विनोदी नाहीये खरं तर. Social media नावाचं एक वादळ दिवसेंदिवस जास्त जास्तच अक्राळविक्राळ स्वरूप धारण करायला लागलंय. या वादळाने उडवलेली धूळ डोळ्यात - आणि डोक्यातही - गेल्यामुळे , आता आपण नक्की कुठे चाललोय किंवा काय करतोय हे बहुतेक कुणाला कळेनासंच झालंय. त्यामुळेच बहुदा, आपण कुठे काय reaction देतोय, आपण जे फॉरवर्ड करतोय ते खरंच खरं आहे की नाही, त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात याचा साधा विचार करायचं भानही अनेकांना राहिलेलं नाही. आला काही मेसेज की कर Whatsappवर १०० जणांना फॉरवर्ड नाहीतर टाक फेसबुकवर.. दुर्दैवाने, या 'डोकं गहाण टाकून नुसतं येईल ते फॉरवर्ड' करण्याच्या नादात माणसांची ओरिजिनॅलिटी, क्रिएटिव्हिटी हरवत चालली आहे. कारण कितीशी माणसं स्वतः काही विचार करून, लिहून वगैरे पोस्ट करतात? 'बस ईधरका माल उधर'!!

सुरवाती सुरवातीला, एकमेकांपासून दूर गेलेल्या माणसांना जवळ आणण्यासाठी कौतुकपात्र ठरलेल्या या social media चा आता खरोखर अतिरेक झालाय. आता ते दूरचेच इतके जवळचे वाटू लागलेत की खरे जवळचे नजरेआड होत चाललेत. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांशी धडपणे बोलायलाही वेळ नसणाऱ्या माणसांकडे virtual जगतात इतकं ऍक्टिव्ह असायला वेळ कसा असतो हे एक आश्र्चर्यच आहे. अनेक दिवसांनी एकत्र आलेली बहिण-भावंडं, मित्रमंडळी जेव्हा समोरासमोर एकमेकांशी बोलून, मनाने जास्त जवळ येण्याऐवजी एकाच खोलीत बसून, पण आपापल्या मोबाईल्स मधे डोकी खुपसून, त्यावरच्या कुठल्याशा ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी बोलताना (?) दिसतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते खरंच! म्हणजे आपण ज्या व्यक्तीशी virtual माध्यमातून बोलत आहोत ती स्वतः, प्रत्यक्ष, आत्ता या क्षणी आपल्या समोरच आहे आणि आपण तिच्याशी फेस -टू-फेस पण बोलू शकतो हेही विसरायला होत असेल माणसाला? आणि मग त्यातूनच 'नवरा, जेवणाच्या टेबलवर समोरच बसलेल्या बायकोकडे पोळी पण Whatsapp वरूनच मागतोय' अशा प्रकारचे jokes (?) तयार  होतात आणि मग काय? ते पण हजारोंना फॉरवर्ड!!

आपल्या आयुष्यात घडणारी अगदी छोट्यात छोटी आणि खरं तर ज्याने दुसऱ्याला काहीही फरक पडत नाही अशी प्रत्येक घटना social websites वर टाकून पब्लिसिटी मिळवायचं व्यसनच जडलंय हल्ली कित्येकांना.. मग मतदान केल्याचे photos टाकणं म्हणजे तर फारच 'important' गोष्ट! आपण आपलं एक बेसिक कर्तव्य पार पाडलंय हे कळायला नको का जगाला?! कुठल्याही प्रेक्षणीय ठिकाणी जा, माणसांना ते स्थळ, तो परिसर डोळ्यात साठवून घेण्यापेक्षा स्वतःची छबी कॅमेऱ्यात साठवण्यातच जास्ती इंटरेस्ट असतो. आणि मग लगेच त्या छब्या जातात फेसबुकवर. म्हणजे प्रत्यक्ष ते स्थळ बघण्यापेक्षा, 'आम्ही असं असं स्थळ बघून आलो' हे लोकांना कळवण्यातच खरा आनंद! या पब्लिसिटीच्या नादात अगदी खाजगी क्षण सुद्धा चव्हाटयावर आणू लागलेत आजकाल लोक.. बरं, तुम्ही आज काय खाल्लं, कितीला उठलात किंवा कुठली सिरीयल पाहिलीत याच्याशी तमाम जनतेचा काय संबंध? (एखाद्या वेळी काही special असेल तर ठीके, पण रोज रोज?!!) खोटं वाटेल पण फेसबुकच्या एका ग्रुपवर नुकतीच एका महाभागांनी एक पोस्ट टाकली होती - 'आज सकाळी माझा गाल चावला गेला!!!!!!!!' अरे???!!! काय हे? आता फक्त 'लघु किंवा दीर्घ शंकेला जाऊन येत असल्याचे' updates टाकू नयेत कुणी म्हणजे मिळवली!!! हा social mediaचा वापर म्हणायचा की गैरवापर?

खरं पहायला गेलं तर 'social' या शब्दात 'society' चा - 'समाजाचा' काहीतरी विचार असणं अभिप्रेत आहे. पण मग, 'socially active' असणारे कितीजण खरंच 'समाजासाठी active' असतात? अगदी 'समाजकार्य' वगैरे राहूचदे पण कित्येक घरांमधे आज अशी परिस्थिती आहे की virtual जगातली नाती जोडण्याच्या नादात घरातल्याच म्हाताऱ्या माणसांशी निवांत बसून चार शब्द बोलायला पण कुणाला फारसा वेळ नाही. समाजकार्य करायचं म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात जाणे वगैरे तर लांबचीच गोष्ट झाली.. हां पण social sites वर सामाजिक विषयांवर गप्पा सुरु करा - सगळे पुढे! नुसत्या कृतीशून्य चर्चा.. 'Social' च्या नावाखाली जास्तीत जास्त 'स्वकेंद्रित' होणं म्हणजे 'socially active' असणं असं गणित झालंय बहुतेक. कुठल्याही गोष्टीप्रमाणे यालाही अपवाद आहेत अर्थात. या 'social media' चा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेऊन काही विधायक करणारे लोक ही आहेत; पण दुर्दैवाने खूपच  कमी. बाकीचे सगळे मात्र 'social' पोस्ट टाकता येण्यासाठीच 'life' जगतात की काय देव जाणे!!       
   

© रश्मी पानसे - नाझिरकर

Sunday, November 6, 2022

नित्य दिवाळी!!

येणार, येणार; आली, आली म्हणता म्हणता दिवाळी येऊन गेली सुद्धा...

आणि हे ह्याच वर्षीचं नाही, तर दर वर्षीचं आहे. कित्ती आधीपासून दिवाळीचे वेध लागत असतात!! म्हणजे खरंतर, नवीन वर्षाचं calendar आल्या आल्याच, पहिले, 'ह्या वर्षी दिवाळी कधीये?' हे बघणारे माझ्यासारखे बरेच असतील. पण ती आली की भरकन संपूनही जाते... नुकतीच दिवाळी होऊन गेलीय हे दर्शवणाऱ्या उगाच चार दोन किरकोळ खुणा तेवढ्या मागे राहतात... दारात दिमाखात उभा असलेला, पण हळूहळू पडझड व्हायला लागलेला, किल्ला... 'हो, हो, उद्या नक्की काढतो' म्हणत नवऱ्याने तसंच ठेवलेलं दारावरचं lighting आणि आकाशकंदील... (दिवाळीतल्या नवीन वर्षाच्या निमित्ताने केलेली रोषणाई, direct इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावरच निघते बरेचदा 😜😜) डब्यांमधून उरलेले फराळाचे पदार्थ... (हो, हे लिहीत असताना ते डबेही जाणीव करून देतायत मला की 'नवऱ्याचं lighting चं काम जसं pending आहे तसंच तुझंही हे नंतरच्या आवराआवरीचं काम राहिलंच आहे' 😔😔) लेकाच्या फटाक्यांपैकी, नंतर match जिंकल्यावर वगैरे फोडण्यासाठी म्हणून ठेवलेले थोडेफार फटाके... एव्हाना बऱ्यापैकी संपत आलेला 'मोती' साबण... बाहेरून कुठेतरी लांबून, मधेच येणारे फटाक्यांचे आवाज... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी संपली तरी सुट्टी संपली नसल्यामुळे घरात चालू असणारा धिंगाणा... 

 

आपल्याकडे इतके विविध सण असले तरी दिवाळी म्हणजे सगळ्यात लाडका सण - अगदी लहानपणापासून. बहुतेक सगळ्यांचंच असावं असं. अर्थात वय वाढल्यामुळे आणि बदललेल्या भूमिकांमुळे, उत्साहाची level पण बदललीय आताशा. कारण लहानपणी काय, सण साजरा करण्याचे सगळे कष्ट तर आईबाबांनीच घेतलेले असायचे. आम्ही म्हणजे नुसतं, 'खाओ पीओ, मजा करो'! आईने बिचारीने खपून बनवलेला फराळ हाणायचा, बाबांनी आणून दिलेले फटाके, दादाच्या मागे मागे करत फोडायचे, नवीन कपडे घालून मिरवायचं, बास!! पण आता आईची भूमिका माझ्याकडे आल्यामुळे, ती खपून फराळ बनवणारी 'बिचारी', मी असते! 😜😜 मग आपोआपच लहानपणच्या निष्काळजी, निवांत उत्साहाला, जबाबदारीचा break लागतोच ना! 😂😂 

 

तर ह्या फराळाची एक वेगळीच तऱ्हा! दिवाळी आली आणि फराळाचा विषय सुरू झाला की दरवर्षीचा एक ठरलेला dialogue म्हणजे, 'हेss उगीच आपलं मरमरून इतकं सगळं बनवायचं आणि शेवटी संपवताना मारामार'! आणि दर वर्षी असंच म्हणत म्हणत, परत फराळ मात्र बनवायचा सोडायचा नाही! 🤭🤭 त्यात दरवर्षीचा अनुभव असला तरी नवरा सांगणार, 'भरपूर बनव हां काय ते, उगीच एवढं एवढंसं नको 🙄🙄, कुणाकुणाला द्यायला वगैरे कमी नकोय पडायला..' नाही, ते कुणाकुणाला दिलं जातं हे खरंय, पण ते 'कुणीकुणी' पण देतातच की आपल्याला!! पण नाही! बायकोचं पटवून घेतलं तर त्सुनामी नाही येणार?? 😏😏 आणि पहिल्याच दिवशी ह्याचा स्वतःचा, फराळाचं खाण्याचा उत्साह निम्म्यावर आलेला असतो. पण काय करणार? 'नवऱ्याला खुश ठेवण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो' वगैरे तद्दन फिल्मी dialogues चा पगडा असल्यामुळे, खपते 'बिचारी'! 😜😜

 

ह्या फराळाच्या पदार्थांचं ना, आपल्या आयुष्यासारखं असतं, किनई? आपल्याला हव्याहव्याशा गोष्टी चटकन संपून जातात. म्हणजे आपला तसा स्वभावच असतो; आवडणाऱ्या, हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टींनाच preference देण्याकडे आपला कल असतो आणि जरा कमी आवडत्या गोष्टी आपण उगाचच मागे टाकत राहतो - भले नंतर तरी त्या आपल्यालाच पूर्ण करायच्यात हे माहीत असूनही... पण अशाने, शेवटी, नकोशा वाटणाऱ्या गोष्टी एकत्र साठून राहतात आणि आपल्यालाच त्या संपवाव्या लागतात. फराळाच्या बाबतीत किमान, अगदीच आपल्याला खपलं नाहीच, संपलं नाहीच तर, शेवटी, आपल्या घरी येणाऱ्या मावशींना वगैरे देऊन तरी टाकू शकतो आपण एकवेळ; पण आयुष्याच्या बाबतीत मात्र तसं नसतं ना boss! My life, my sufferings : non-transferable! 

 

फराळासारखीच अवस्था कपड्यांचीही! बरेचदा, घ्यायचे म्हणून नवीन कपडे घेतले जातात; पण नंतर, कपाटातून ओसंडून वाहणाऱ्या आधीच्या कपड्यांना 'sharing' शिकवून, नव्या कपड्यांसाठी जागा करून द्यायला लावावी लागते; नाहीतर जुमानत नाहीत अहो ते! 😜😜

पणत्यांचीही तीच गत... जितक्या जास्त पणत्या मांडू, तेवढं सुंदर दिसतं म्हणून मारे उत्साहाने जास्तीत जास्त पणत्या लावल्या जातात; पण दिवाळी संपली की त्यांची सगळी उस्तवार करावी लागते. 

उटणी वगैरे संपवावी लागतात, तेला-उटण्यासाठी काढलेल्या चांदीच्या वाट्या नीट आत ठेवून द्याव्या लागतात. 

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे 2-3 दिवस आणि कदाचित पुढचेही काही दिवस जी वेगवेगळी खादाडी होते, तिच्या पार्श्वभूमीवर शरीराला पण मुश्किलीने 'normal' वर आणावं लागतं... 🙈🙈

 

म्हणजे प्रत्यक्ष दिवाळी तर 2 नाहीतर 3 दिवसात निघूनही जाते; पण मागाहून करण्यासाठी कामांची list मात्र ठेवून जाते. आणि तरीही ती आपल्याला इतकी हवीहवीशी का बरं वाटत असेल? कारण, येण्याच्या आधीपासून, प्रत्यक्ष असताना आणि गेल्यावरही ती आपल्याला एक नवा उत्साह, नवी ऊर्जा, नवा प्रकाश देऊन जाते! कुठल्या ना कुठल्या आठवणींच्या रूपाने कित्येक दिवस आपल्या मनात रेंगाळत राहते! नात्यांमधली वीण घट्ट करून जाते! 

 

एखादी गोष्ट आपल्याला कितीही हवीहवीशी वाटली, तिच्यासाठी आपण कितीही मेहनत घेतली असली, तरीही ती काही कायमसाठी रहात नाही, ती मागे सोडून आपल्याला पुढे जावंच लागतं. दिवाळीसाठी कितीही खपून, कितीही मोठी, कितीही सुंदर रांगोळी काढली आणि ती भले आपल्याला कितीही आवडली, तरी दुसऱ्या दिवशी ती पुसून टाकावीच लागते ना, तसंच... 

आणि ह्याचीच दुसरी बाजू अशीही आहे की एखादी गोष्ट कायमसाठी राहणार नाहीये म्हणून 'जाऊदे ना, काय दोन दिवसांसाठी एवढं करत बसायचं?' असं म्हणत, तिच्यासाठी कष्टच घेतले नाहीत असंही करून चालत नाही. नाहीतर आपल्याला कशातूनच आनंद मिळणार नाही. त्या त्या वेळचे कष्ट सुद्धा एक वेगळं समाधान देऊन जात असतात. त्या त्या क्षणाचा आनंद देत असतात! 

 

दिवाळी हा प्रकाशाचा सण! दुरीताच्या, नकारात्मकतेच्या तमावर मात करण्याचा सण! आपले सगळे प्रश्न, तात्पुरते का होईना, बाजूला ठेवून, आनंद घ्यायची आणि द्यायची शिकवण आपल्याला दिवाळी देते. आणि मग, अशा पद्धतीने, कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगात गुंतून न पडता, येईल तो क्षण साजरा करणं जर आपल्याला जमायलाच लागलं, तर आपल्याकडे तर 'नित्यच दिवाळी' होईल, नाही का??? 🪔🪔🪔

 

 

© रश्मी पानसे - नाझिरकर