Thursday, June 8, 2017

वटपौर्णिमा

आज वटपौर्णिमा! सकाळी, सालाबाद प्रमाणे, 'आम्हीच आपले तुमच्यासाठी उपवास वगैरे करायचे, तुम्ही करा की काहीतरी' वगैरे 'हलकेफुलके' विषय झाले.. हे विषय झाले नाहीत तर सावित्री प्रसन्न होत नाही म्हणे!! पण या वर्षी आमच्या 'वडोबाने' अगदी मनावरच घेतलं वाटतं आणि अगदी मोठ्या मनाने जाहीर केलं की रात्रीच्या बापलेकांच्या जेवणाची व्यवस्था मी करण्याची गरज नाही! जे काही खायचं असेल ते घरी बनवूनच हे ही वर कबूल केलं. म्हटलं, चला, हे ही नसे थोडके!!

आता यांची व्यवस्था मी करायची नाहीये म्हणल्यावर मी आपलं खाऊन घ्यावं म्हणलं काहीतरी ४ घास! आज वटपौर्णिमेचा उपवास म्हणून कालच 'अहोंनी' काय काय तरी पदार्थ आणून ठेवले होते.. खाऊन पिऊन अगदी 'कडक' उपवास असतो ना माझा! 😜

तर, मी आपलं कसंतरी उदरभरण करतीये आणि आत्ता, बापलेक दोघंही माझ्या समोर बसून 'homemade' पिझ्झा खात आहेत!! 😈😈 कधी नव्हे ते आमच्या वडोबाला पिझ्झा करावासा वाटला - मला काही करायला लागू नये म्हणून!! 😷😷 बरं, केला ते केला, वर दोघांनी माझ्या समोर बसून ताव मारावा? जाहीर निषेध!!

लेकाला म्हटलं, 'काय रे आईला सोडून सोडून खातोयेस ना?' तर म्हणे, 'तू खा की'.. म्हटलं, 'अरे, माझा उपवास आहे ना..' तर अतिशय निरागस आवाजात पुढचा प्रश्न आला - 'आई, अजून तुझा चंद्रोदय नाही झाला?' आता याला काय सांगू की आजच्या उपवासाला चंद्रोदय कुठला, अमावास्या च असणार आहे!! 😜😜😜